आज सकाळपर्यंत लस मिळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:41+5:302021-04-12T04:15:41+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मागच्या काही दिवसांत लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला ...

आज सकाळपर्यंत लस मिळण्याची शक्यता
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मागच्या काही दिवसांत लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लसीकरणाचा वेग वाढला होता. त्यातच जिल्ह्याला पुरवठा झालेली लस संपली आहे. रविवारी एकाही केंद्रावर लसीकरण झाले नाही. त्यामुळे आता जिल्हावासीयांना लसीची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने लसीची मागणी नोंदविली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत औरंगाबाद येथे लस पोहोचणार असून, परभणी जिल्ह्यातील अधिकारी लस प्राप्त करून घेण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे साधारणता दहा हजार डोसेस मिळतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. दरम्यान, आज सकाळपर्यंत जिल्ह्यात लस पोहोचण्याची शक्यता असून, विविध केंद्रांना आज ही लस वितरित केली जाणार आहे. त्यानंतरच लसीकरण सुरू होईल.
९९ हजार नागरिकांना लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. आज, सोमवारी दहा हजार डोसेस मिळण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. जिल्ह्यात दररोज पाच हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे आज मिळालेली लस दोन दिवस पुरणार असून, त्यानंतर पुन्हा लसीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.