विजय पाटील/ परभणी- परंपरागत राजकीय विरोधकांनी एकमेकांसोबत जाणे पसंत केले नाही. महापालिकेतही विरोधाची ही धार कायम दिसत आहे. त्याचा फटका बसला तरीही चालेल, मात्र एकमेकांना सोबत घ्यायचे नाही, हीच भूमिका दिसून येत आहे. भाजपने शिंदेसेनेला जवळ केले, मात्र राष्ट्रवादीशी जमणार नाही, हे स्पष्ट केले. काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाशी बोलणी करतेय, मात्र उद्धवसेनेशी अबोला धरला आहे.
परभणी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत स्वबळ आजमावण्यावरच भर देण्यात आला. जेथे पर्यायच नाही, अशा ठिकाणी सर्वपक्षीय युती झाली. सोनपेठ व सेलूमध्ये त्याचा प्रत्यय आला. सेलूत काँग्रेसने राष्ट्रवादी (अजित पवार) शी
सलगी केली. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार) ला मोजले नाही. काँग्रेसचा उमेदवार अल्पमताने नगराध्यक्षपदासाठी पडला, तर सोनपेठला राष्ट्रवादी (अजित पवार) ला रोखण्यासाठी झाडून पुसून सगळेच एकत्र आले. त्याचे दृश्य परिणामही दिसून आले. राष्ट्रवादीला रोखण्यात यश आले. पाथरीत राष्ट्रवादी (अजित पवार) ची मंडळी लढणार हे माहिती असल्याने भाजपने सपशेल अंग काढून घेतले. त्यामुळे तेथे शिंदेसेनेला फायदा झाला.
हिंदूबहुल भागातूनच त्यांच्या जास्त जागा आल्या. मुस्लीमबहुल भागात बहुतेक ठिकाणी काँग्रेसचाच पगडा दिसून आला. फक्त जिंतूर व सेलूमध्ये मात्र मुस्लीम नगरसेवक कमळावर निवडून आणण्याचा बोर्डीकर पॅटर्न निर्माण झाला आहे. तरीही त्यामागे मेघना बोर्डीकर यांनी डोअर टू डोअर केलेला प्रचार आणि उमेदवारांना दिलेले मोठे बळ ही कारणे आहेत. परभणीत एकेका प्रभागाची व्याप्ती अन् मतदारसंख्या पाहता तेवढे बळ तथा रसद कुणाकडेच नाही. सर्वांनाच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा आधार घ्यावा लागणार आहे.
परभणीत काँग्रेस उद्धवसेनेला सोबत घेण्याच्या मनःस्थितीत नाही. मागच्यावेळी सत्ताधारी असल्याने माजी नगरसेवकांची मोठी फौज आहे. शिवाय २०१२ मध्ये ते मनपात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे इच्छुकांचे दिग्गज चेहरे
पाहता तडजोडीत जास्त जागा सोडता येणार नाहीत. तुलनेने राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडे कल त्यामुळेच असून त्यांच्याकडे दिग्गज चेहऱ्यांची असलेली कमतरता लक्षात घेता त्यांना सोबत घेऊन एक सवतासुभा कमी करण्याचा प्रयत्न दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) चीही हीच अवस्था आहे. २०१२ मध्ये सत्ताधारी व २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. त्यांना पुन्हा सत्ता खेचून आणण्याची अपेक्षा आहे.
शिवाय शहरात मुस्लीम, दलित मतांचा मोठा टक्का असल्याने भाजपसोबत गेल्यास नुकसानीची भीती वाटत आहे. त्यातच भाजपचे पूर्वीचे संख्याबळ कमी असतानाही ते लहान भाऊ म्हणून घ्यायला तयार नाहीत. त्यापेक्षा शिंदेसेना लहान भाऊ म्हणून मिळेल ते पदरात पाहून घेत भाजपच्या साहाय्याने निदान सभागृहात तरी प्रवेश करता येईल, हे पाहत आहे. जसा आघाडीला सेलू व पूर्णत एकत्र न लढल्याचा फटका बसला, तसा महायुतीला बसला असला तरीही महायुतीतीलच कोणतातरी पक्ष निवडून आल्याने तो जाणवला नाही. आघाडीचा या भानगडीत सफाया झाल्याने त्यांना तो जाणवत असला तरीही बाणा सोडायला कुणी तयार नाही.
नेत्यांमधील संघर्षामुळे युती व आघाडीत बिघाडी
महायुतीतील मेघना बोर्डीकर यांच्याशी आ. राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे - यांचे फारसे जमत नाही, तर आघाडीतील खा. संजय जाधव यांच्याशी माजी आ. बाबाजानी दुर्राणी जुळवून घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या नेत्यांतील संघर्षामुळेही बोलणीलाच वाव उरला नाही.
महायुतीची नेतेमंडळी जोरात
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महायुतीतील नेतेमंडळी जोरात आहेत. भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेला मनपातही त्याचप्रमाणे यश मिळेल, असे वाटत आहे. त्यातच निवडणुका जिंकायचा लक्ष्मीअस्त्राचा फॉर्म्युला वापरण्याची तयारी असणाऱ्यांना तर इतरांना सोबत घ्यायचीही गरज वाटत नाही.
Web Summary : Parbhani politics sees discord within alliances due to leader clashes. Local elections reveal fractured unity. BJP, Shiv Sena, NCP, and Congress navigate complex partnerships, impacting future municipal strategies. Victory hinges on local dynamics.
Web Summary : परभणी की राजनीति में नेताओं के संघर्ष के कारण गठबंधन में मतभेद। स्थानीय चुनावों में खंडित एकता उजागर। भाजपा, शिवसेना, एनसीपी और कांग्रेस जटिल साझेदारी को नेविगेट करते हैं, जिससे भविष्य की नगरपालिका रणनीतियाँ प्रभावित होती हैं। जीत स्थानीय गतिशीलता पर निर्भर है।