आयुष्य ‘लॉक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ ! ५ वर्षात लिटरमागे ३८ रुपयांची वाढ !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST2021-05-14T04:17:27+5:302021-05-14T04:17:27+5:30
परभणी शहराला मनमाड येथील डेपोमधून इंधनाचा पुरवठा होतो. परभणी ते मनमाड हे रस्त्याचे अंतर अधिक असल्याच्या कारणावरून इतर शहरांच्या ...

आयुष्य ‘लॉक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ ! ५ वर्षात लिटरमागे ३८ रुपयांची वाढ !!
परभणी शहराला मनमाड येथील डेपोमधून इंधनाचा पुरवठा होतो. परभणी ते मनमाड हे रस्त्याचे अंतर अधिक असल्याच्या कारणावरून इतर शहरांच्या तुलनेत परभणीकरांवर वाहतूक खर्चाचा अधिक बोजा टाकला जातो. यातून इंधनाचे दर परभणीत सर्वाधिक आहेत. १ मे २०१६ रोजी परभणी शहरात पेट्रोल प्रति लिटर ६२ रुपये ५७ पैसे विकले जात होते. आता १३ मे रोजी हाच दर १०० रुपये ७५ पैसे आहे. डिझेलही २०१६ मध्ये ५१ रुपये ५२ पैसे प्रति लिटर होते. ते आज घडीला ९० रुपये ६८ पैसे झाले आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीने परभणीकर त्रस्त झाले आहेत.
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
पेट्रोलच्या किमतीपेक्षा यावर आकारण्यात येणारे कर कितीतरी पटीने अधिक आहेत. एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत ३१ रुपये ५३ पैसे आहे. त्यात एक्साईज ड्युटी ३२ रुपये ९८ पैसे, राज्य शासनाचा टॅक्स २६ रुपये २६ पैसे आणि डीलरचे कमिशन ३ रुपये ४१ पैसे आहे. त्यामुळे पेट्रोलची मूळ किंमत आणि प्रत्यक्ष त्यावरील कर पहाता किती मोठ्या प्रमाणात हा नागरिकांना कर द्यावा लागतो हे स्पष्ट होते.
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार
दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. त्यातही परभणीत सर्वाधिक पेट्रोल महाग दिले जात आहे. त्यामुळे आता सायकलीवरच फिरण्याची वेळ आली आहे. सरकारने जरा सर्वसामान्यांचा विचार करावा. इंधन दरवाढीने जगणे मुश्कील झाले आहे.
- अजय पाटील
निवडणुका आल्या की, इंधन दरवाढ होत नाही. निवडणुका संपल्यानंतरच कशी काय वाढ होेते? केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेणे बंद करावे. दररोजच्या दरवाढीने आपली जुनी सायकलच बरी म्हणण्याची वेळ केंद्र सरकारने आणली आहे.
- प्रदीप काळे
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे एक तर वर्षभरापासून कामावर परिणाम झाला आहे. अशात दररोज पेट्रोलचे दर वाढत आहेत. सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश त्रस्त झाला असताना यांना दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून काहीच कसे वाटत नाही. हे केंद्र सरकार जनतेसाठी आहे? की जनतेला लुटण्यासाठी आहे?
- सुधीर कांबळे