लायसेन्सची मुदत संपली, अपॉइंटमेंटसाठी प्रतीक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST2021-06-09T04:21:50+5:302021-06-09T04:21:50+5:30
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास दीड महिना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा संसर्ग कमी ...

लायसेन्सची मुदत संपली, अपॉइंटमेंटसाठी प्रतीक्षा करा
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास दीड महिना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ७ जूनपासून जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत झाले असले तरी परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कामाचा वाढलेला व्याप लक्षात घेता, आठवडाभरापूर्वीच कार्यालयाचे कामकाज २५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू केले आहे. ३० जूनपर्यंत अनेकांच्या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे आहे; परंतु या कार्यालयातील सर्व अपॉइंटमेंट फुल्ल असल्याने संबंधितांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहण्यावाचून पर्याय नाही. परिणामी या सर्व व्यक्तींची अडचण होणार आहे.
सुट्टीतही कामकाज
वाहन परवान्यांच्या नूतनीकरणाची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळही तोकडे असल्याने नियमित कामकाजावर याचा परिणाम होत असल्याचे समजते.
असा आहे कोटा
परभणी येथील आरटीओ कार्यालयांतर्गत कोरोनाचे नियम पाळून गर्दी होऊ नये, म्हणून दररोज शिकाऊ व कायम परवान्यासाठी प्रत्येकी २० जणांनाच अपॉइंटमेंट देण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन अपॉइंटमेंट मिळणे तर दूरच, नूतनीकरण करण्याची प्रक्रियाही मंदगतीने होत आहे. परिणामी ३० जूनपर्यंत परवान्याची मुदत संपलेल्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
परिवहन अधिकारी म्हणतात
जनतेच्या कार्याची निकड लक्षात घेता गेल्या आठवड्यापासून नियमांचे पालन करून २५ टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयाचे करण्यात येत आहे. अपॉइंटमेंटच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणीही गर्दी करू नये. सुटीच्या दिवशीही कामकाज करण्याचे नियोजन आहे.
- श्रीकृष्ण नखाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आठवडाभरात ४० वाहनांची नोंदणी
परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामकाज गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. आठवडाभरात ४० नवीन वाहनांची नोंदणी या कार्यालयात करण्यात आली आहे. कोरोनामुळे थांबलेले या कार्यालयाचे कामकाज हळूहळू पूर्वपदावर येत आहे.