कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST2021-05-21T04:18:46+5:302021-05-21T04:18:46+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गात मोठी घट झाली असून, गुरुवारी (दि. २०) २ हजार ६२३ चाचण्यांमधून १४१ पॉझिटिव्ह रुग्ण नोंद ...

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
परभणी : कोरोनाच्या संसर्गात मोठी घट झाली असून, गुरुवारी (दि. २०) २ हजार ६२३ चाचण्यांमधून १४१ पॉझिटिव्ह रुग्ण नोंद झाले आहेत, तर दुसरीकडे १९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. संसर्ग घटल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही २ हजार ६०० वर आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून जिल्हावासीयांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. बाधित रुग्णांची संख्या दररोज कमी होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या असल्या तरी रुग्णसंख्या मात्र वाढलेली नाही. गुरुवारी आरोग्य विभागाला २ हजार ६२३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २ हजार ३९२ अहवालांमध्ये २ हजार २९२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. रॅपिड टेस्टच्या २३१ अहवालांत १९० अहवाल निगेटिव्ह असून, ४१ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार २३३ झाली असून, ४३ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार १७४ झाली आहे. सध्या २ हजार ६०० रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी दिवसभरात १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
नऊ रुग्णांचा मृत्यू
बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे प्रमाण अद्यापही कमी झाले नाही. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंता कायम आहेत. गुरुवारी नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात दोन, आयटीआय हॉस्पीटलमध्ये एक, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात तीन आणि खासगी रुग्णालयात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले नऊही पुरुष रुग्ण आहेत.