The land near the B. Raghunath Auditorium is in the name of the Baldia government and under Parabhani Municipality | बी़ रघुनाथ सभागृहालगतची जमीन बलदिया सरकारच्या नावे
बी़ रघुनाथ सभागृहालगतची जमीन बलदिया सरकारच्या नावे

ठळक मुद्देजमिनीचा ताबा मनपाकडे 

परभणी : शहरातील बी़ रघुनाथ सभागृहाच्या लगत असलेल्या सर्वे नंबर ३६६ ची ३ हेक्टर ८१ आर जमीन खाजगी व्यक्तींच्या नावावरून आता बलदिया सरकारच्या नावे झाली असून, या जमिनीचा आता महानगरपालिकेकडे ताबा आला आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या आदेशानंतर या संदर्भातील सूत्रे वेगाने हलली होती़ 

परभणी शहरातील बी़ रघुनाथ सभागृहाच्या  बाजुला असलेल्या सर्वे नंबर ३६६ वरील ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर सामाईक क्षेत्रांतर्गत शेख नबी शेख सुलतान, शेख सलीम शेख नबी, शबाना रफियोद्दीन, फहेमिदा बेगम मो़ अब्दुल रहेमान, फातेमा बी शेख नबी, ज्ञानेश्वर सखारामजी शिंदे, किशोर शंकरलाल मंत्री, कृष्णराव सखारामजी शिंदे, सुभद्राबाई सखारामजी शिंदे, महेंद्र मधुसूदन साळुंके, मधुसूदन रावसाहेब साळुंके, जयेश मधुसूदन साळुंके, सुदामराव श्रीपतराव कदम यांची नावे सातबारावर होती़ या संदर्भात काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर व उपविभागीय अधिकारी अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्याकडेही तक्रार आली होती़ त्यानुसार डॉ़ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी करून सुनावणी घेतली़

संबंधित व्यक्तींना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले़ सुनावणी अंती  त्यांनी सदरील जमीन बलदिया सरकारची असल्याचे निश्चित करून खाजगी व्यक्तींची नावे सातबारावरून वगळण्याचा व बलदिया सरकार यांचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय दिला. सातबारावर तशी नोंद करण्याचे आदेश परभणीचे तलाठी भालचंद्र टेकाळे यांना दिले़ त्यानुसार १५ जुलै २०१९ रोजी ८३१५ फेरफार क्रमांकानुसार तशी नोंद घेण्यात आली आहे़ शिवाय या जमिनीचा ताबा  महानगरपालिकेला घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने तशी नोंदही करून घेतली आहे़ जमिनीचा ताबा मिळविण्याच्या अनुषंगाने आयुक्त रमेश पवार यांनी ज्यांचा जमिनीवर सध्या ताबा आहे, त्यांना ८१ ब ची आठ दिवसांपूर्वी नोटीस बजावली असून, ३३ दिवसांत सदरील जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत़ 

विशेष म्हणजे या जमिनीवर करण्यात आलेल्या बांधकामालाही मनपाकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले़ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या ३  हेक्टर ८१ आर जमिनीची मोजणी भूमिअभिलेख विभागाकडून करून घेण्यात येणार आहे़ त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना जमीन मोजणी करून देण्याचे पत्र मनपाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले़ जमिनीची मोजणी करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष महानगरपालिका या  जागेचा ताबा घेणार आहे़ सद्यस्थितीत कागदोपत्री ही जागा बलदिया सरकारच्या नावे झाली असून, ती महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे़ 

क्रीडांगणासाठी वापर करण्याची सूचना
सर्वे नंबर ३६६ वरील अतिक्रमण हटवून ताबा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना दिले होते़ मनपाचे चांगले क्रीडांगण तयार करण्याच्या दृष्टीकोणातून या जागेचा वापर करावा, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाला दिली होती़ त्यामुळे भविष्यात या जागेवर मनपाच्या वतीने चांगले क्रीडांगण उभारले जाण्याची शक्यता आहे़ शहरातील बॅडमिंटन हॉलच्या समोरील बाजुस नाट्यगृहाची इमारत बांधली जात आहे़ या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होईल़, ज्यामुळे भविष्यकाळात क्रीडा स्पर्धांना अडथळा निर्माण होवू शकतो़ ही बाब पाहता सर्वे नंबर ३६६ वरील जमिनीवर वेगळे क्रीडांगण उभे राहिल्यास त्याचा फायदा निश्चितच खेळाडूंना होणार आहे़ 

विभागीय आयुक्तांकडे प्रकरणाची सुनावणी
सर्वे नंबर ३६६ वरील खाजगी व्यक्तींची नावे वगळण्याची कारवाई जिल्हा महसूल प्रशासनाने केल्यानंतर याविरोधात संबंधित व्यक्तींनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अपील केले आहे़ सद्यस्थितीत या अपिलावर सुनावणी सुरू आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी आतापर्यंत सर्वे नंबर २९०, २९२ या संदर्भात घेतलेले निर्णय पाहता सर्वे नंबर ३६६ वरील निर्णय देतानाही अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली़ त्याचाही परिणाम या निकालावर होण्याची शक्यता आहे़ 

Web Title: The land near the B. Raghunath Auditorium is in the name of the Baldia government and under Parabhani Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.