लाॅकडाऊन, डिझेल दरवाढीने उडाला खाद्यतेलाच्या भाववाढीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:08+5:302021-05-27T04:19:08+5:30
परभणी शहर व जिल्ह्यात मागील वर्षी मार्च २०२० पासून कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. यातच मागील दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद ...

लाॅकडाऊन, डिझेल दरवाढीने उडाला खाद्यतेलाच्या भाववाढीचा भडका
परभणी शहर व जिल्ह्यात मागील वर्षी मार्च २०२० पासून कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. यातच मागील दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद आहे. अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या काळात केवळ किराणा, खाद्यतेल आणि भाजीपाला याचीच खरेदी-विक्री सुरू आहे. त्यातही या सर्व साहित्याचे दर मागील १४ महिन्यांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. या महागाईने नागरिकांना जेरीस आणले आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
असे आहेत किराणाचे दर (प्रतिकिलो)
तूरदाळ ९५
हरभरा - ८४
तांदूळ - ५०
साखर - ४०
गूळ - ३७
बेसण - ८०
असे वाढले डिझेलचे दर (प्रतिलीटर)
जानेवारी २० - ८३ रुपये
जून २० - ८५
जानेवारी २१ - ८९
मे २१ - ९१
तेलाचे दर मार्च २० सप्टेंबर २० एप्रिल २१ मे २१ (प्रतिकिलो)
शेंगदाणे १६५ १४५ १८० १९०
सोयाबीन ११२ ९२ १५० १६०
सूर्यफुल १५५ ११० १७० १८०
पामतेल ११२ ८७ १३० १४०
पॅकिंगसह ऑइल डेपोत दर सारखेच
बाजारपेठेत दोन प्रकारचे खाद्यतेल मिळते. एक ऑइल डेपोत मिळणारे रिफाइंड व दुसरे कंपनीच्या पॅकिंगमध्ये मिळणारे तेल. या दोन्हींचे भाव एप्रिलमध्ये लाॅकडाऊनपूर्वी आणि सध्या २६ मे रोजी किरकोळ बाजारात आणि होलसेलमध्ये सारखेच असल्याचे दिसून आले. यामुळे कोणतेही तेल घ्या आणि कुठूनही घ्या, ते ग्राहकांना एकाच भावाने मिळत आहे. अगदी २ ते ५ रुपये या साहित्याच्या विक्रीतून उत्पन्न मिळते, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका
मार्च २०२० ते मे २०२१ या कालावधीत डिझेलचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. परभणी शहरात येणारा सर्व साहित्याचा माल इतर जिल्ह्यांतून तसेच खाद्यतेलही परजिल्ह्यांतून येते. डिझेलचे दर वाढले तर मालाची ट्रान्सपोर्ट रक्कम वाढते. पर्यायाने किराणा साहित्यासह खाद्यतेलाच्या भावावर याचा परिणाम होतो. यामुळे किराणाचे दर मागील एक वर्षात ४० टक्क्यांनी, तर खाद्यतेलाचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत.