‘खाकी’ची रोगप्रतिकारकशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST2021-05-21T04:18:42+5:302021-05-21T04:18:42+5:30
परभणी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यातील पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त ...

‘खाकी’ची रोगप्रतिकारकशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात!
परभणी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यातील पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त होण्याची संख्यही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खाकीची प्रतिकारशक्ती दुसऱ्या लाटेत वाढल्याचे दिसून येते.
परभणी जिल्ह्यात १६९९ पोलीस कर्मचारी तर १३२ पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये आतापर्यंत ४३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले. यातील १३८ कर्मचारी पहिल्या लाटेत तर दुसऱ्या लाटेत २१७ कर्मचारी बाधित झाले. सध्या ७३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
दररोज सकाळी योगासन, प्राणायाम करण्यासाठी वेळ देत आहे. याशिवाय सकस आहार आणि गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या जीम तसेच मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळणे शक्य नसल्याने व्यायाम करत आहे.
- नितीन वडकर, कर्मचारी
दिवसभर बंदोबस्ताचा ताण तसेच अन्य कामांमुळे व्यायामाला पूर्वीसारखा वेळ मिळत नाही. तरी नियमित प्राणायाम करण्यास प्राधान्य देत आहे. तसेच दिवसभर फळांचे सेवन करतो.
- परमेश्वर शिंदे, पोलीस कर्मचारी
दिवसातील अर्धा तास सकाळी व्यायामासाठी देतो. विद्यापीठ परिसरात फिरायला जातो. याशिवाय जेवणामध्ये कडधान्याचे सेवन करतो. पीटी किंवा जीममध्ये एकत्रितरीत्या प्रवेश नसल्याने घरीच काही साहित्य आणून व्यायाम करतो.
-नीलेश भुजबळ, पोलीस कर्मचारी
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज व्यायाम, ग्रीन ज्यूस
कोरोना काळात आयुर्वेदिक काढे घेण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीही या काढ्यांचे सेवन करीत आहेत. तसेच आवळा ज्यूस, गवती चहा आणि ग्रीन ज्यूस सेवन करण्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांचा कल आहे. त्याला व्यायामाची जोड दिली जात आहे.