ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:38+5:302021-05-08T04:17:38+5:30
परभणी पोलीस दलात साधारण १८८५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळेचे बंधन राहिलेले नाही. ...

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !
परभणी पोलीस दलात साधारण १८८५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळेचे बंधन राहिलेले नाही. कोणत्याही क्षणी ड्युटीवर बोलाविले जाते; मात्र ड्युटीचा कालावधी पूर्ण झाल्यावरही घरी जाता येईल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे नोकरीतील ताण कमी करण्यासाठी आपल्यातील सुप्त कला-गुणांना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वाव दिला आहे. यातून स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱ्यांचे मनोरंजन केले जात आहे.
नृत्याने मिळाली ओळख
सहज म्हणून केलेले नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातून राज्यभरात वेगळीच ओळख निर्माण झाली. हाच छंद सुरुवातीपासून होता; मात्र या नृत्यामुळे खा. संजय राऊत यांच्या नावाने मी परभणीतील संजय राऊत म्हणून ओळखल्या जावू लागलो. लॉकडाऊनमध्येही हा छंद जोपासत असल्याचे रमाकांत भदर्गे यांनी सांगितले.
गाण्यातून मिळतो आनंद
मागील २८ वर्षाच्या नोकरीमध्ये दररोज न चुकता गाणे गुणगुणण्याचा छंद जोपासला आहे. गाणे गाण्याची आवड असल्याने दररोज नोकरी व्यतिरिक्त वेगळा वेळ यासाठी देतो. मागील एक वर्षात लॉकडाऊनमुळे सर्वच जण ताण-तणावात आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी सहकाऱ्यांना मी नेहमीच गाणे गाऊन दाखवितो, असे विठ्ठल कटारे यांनी सांगितले.
सादरीकरणातून आनंद
लोकनृत्यासह निवेदक म्हणून, पोलीस आर्केस्टाॅमध्ये अनेकदा काम केले. मागील एक वर्षापासून नृत्य सादर करण्यासह एकांकिका, भाषण हे छंद इतर सहकाऱ्यांसमोर करुन त्यांचा आणि माझा ताण तणाव कमी कऱण्याचा प्रयत्न करतो. यासाठी वेगळा वेळ मिळत नाही, ही खंत असल्याचे रणजित आगळे यांनी सांगितले.
बासरीवादनाची आवड
लहानपणापासून टीव्हीवर पाहिलेल्या कलांपैकी बासरीवादन, माऊथ ऑर्गन याकडे मी वळलो. हा छंद मागील १२ वर्षांपासून जोपासत आहे. पोलीस दलात काम करताना नेहमीच वेळ मिळत नाही. असे असले तरी स्वत:ची व इतरांची करमणूक यासाठी मी माऊथ ऑर्गन आणि बासरीवादनाचा छंद जोपासल्याचे संतोष व्यवहारे यांनी सांगितले.