लेकरांना काचेत ठेवा, पण सुखात ठेवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:43+5:302021-07-26T04:17:43+5:30
पालम : आमचं काहीही बरेवाईट होऊ द्या, आमच्या लेकरांना काचात राहू द्या, पण त्यांना सुखात ठेवा, असे भावनिक उद्गार ...

लेकरांना काचेत ठेवा, पण सुखात ठेवा !
पालम : आमचं काहीही बरेवाईट होऊ द्या, आमच्या लेकरांना काचात राहू द्या, पण त्यांना सुखात ठेवा, असे भावनिक उद्गार शुद्धीवर आलेल्या माता-पित्यांनी काढताच नातेवाइकांचे डोळे पाणावले.
तालुक्यातील आडगाव येथे वाळविलेल्या हळदीला कीड लागू नये म्हणून हळदींच्या पोत्यात टाकलेल्या कीडनाशकाचा वायू तयार होऊन गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना २४ जुलै रोजी घडली. याच प्रकरणातील गंभीर असलेल्या या दोन बालकांच्या आई-वडिलांवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. आडगाव येथील कुगणे कुटुंबासाठी २४ जुलैची रात्र काळरात्र ठरली. हळदीच्या पोत्यात कीड लागू नये, यासाठी ठेवलेल्या विषारी गोळ्यांनी कुगणे परिवाराला उद्ध्वस्त केले आहे. नांदेड येथे उपचार घेताना २४ जुलै दुपारी १ वाजता महादेवी कुगणे (वय २) व कन्हैया कुगणे (वय ४ वर्षे) या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईवडिलांच्या माघारीच नातेवाइकांनी आडगाव येथे त्यांचा अंत्यविधी केला. दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थ व नातेवाइकांनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या ज्योती भीमाशंकर कुगणे (२५) व भीमाशंकर सदानंद कुगणे (२९) या माता-पित्यांना दिली नव्हती.
२५ जुलै रोजी दोघेही माता-पिता शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर लगेच त्यांनी आमची लेकरं कशी आहेत? याची विचारणा केली. दोन्ही मुलं दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी काचात ठेवलीत? अशी समजूत नातेवाइकांनी काढली. कुगणे दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याने व त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना मानसिक धक्का बसू नये, या उद्देशाने नातेवाइकांनी मुलांच्या मृत्यूची माहिती दिली नाही. मात्र ही माहिती दिल्यानंतर आमच्या लेकरांना सुखात ठेवा, उपचारासाठी वेळ लागू द्या, आमचं काही बरंवाईट होऊ द्या, असे म्हणत या दाम्पत्याने अश्रूंना वाट वाट मोकळी करून दिली. हा प्रसंग पाहून उपस्थित असलेले सर्वच नातेवाइकांचे डोळे पाणावले. दरम्यान, ही दु:खद घटना कुगणे दाम्पत्यास कशी सांगावी? याच चिंतेने नातेवाईक बुचकळ्यात पडले आहेत.