जिंतूरचे कोविड सेंटर बनले रुग्णांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:05+5:302021-05-27T04:19:05+5:30
कोविडच्या दुसऱ्या लाटेने राज्यभरात खूप मोठा धुमाकूळ घातला असून मधुमेह, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण या साथरोगाला बळी पडून ...

जिंतूरचे कोविड सेंटर बनले रुग्णांसाठी आधार
कोविडच्या दुसऱ्या लाटेने राज्यभरात खूप मोठा धुमाकूळ घातला असून मधुमेह, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण या साथरोगाला बळी पडून अनेक रुग्णांनी आपले जीव गमावले आहेत. कोविड या साथरोगाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांनी पुढाकार घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मार्च रोजी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर शहरातील फिजिशियन डॉ. भारत लहाने, डॉ. योगेश दहिफळे, डॉ. दुर्गादास कानडकर, डॉ. माघाडे यांनी खासगी हॉस्पिटल्स सांभाळत. या कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास सुरुवात केल्याने रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला. अवघ्या दोन महिन्यात या सेंटरमध्ये ४१४ रुग्ण भरती झाले असून अतिगंभीर असलेल्या ६५ रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी संदर्भित करण्यात आले. तर ३४९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. १२३ रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला असून ते सुद्धा ठिक होऊन घरी गेले आहेत. जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चव्हाण, डॉ. अनिस खान, डॉ. शैलेश राठोड, डॉ. दीपिका खिल्लारे, डॉ. सागर वाल्हेकर यांच्यासह येथील पॅरामेडिकल स्टाफने सुद्धा झोकून देऊन रुग्णसेवा केली असल्याने ग्रामीण भागातून येथे भरती झालेल्या रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिंतूर तालुका तसा मागासलेला तालुका असून आर्थिकदृष्ट्या सुद्धा फारसा प्रगत नसल्याने व जिल्ह्याच्या ठिकाणी बेड व उपचारासाठी होणारी परवड बघता येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तालुक्यातील रुग्णासाठी आशेचा किरण ठरले आहे.
भरती झालेले रुग्ण- ४१४
रेफर केलेले रुग्ण- ६५
ऑक्सिजन दिलेले रुग्ण- १२३
पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- ३४९