रेल्वे स्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफॉर्म तिकीट ३०, पार्किंग १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:59+5:302021-08-25T04:22:59+5:30
परभणी रेल्वे स्थानक येथे कोरोनापूर्वी १० रुपये प्लॅटफॉर्मचे टिकीट होते. कोरोनाकाळात रेल्वे बोर्डाने हे तिकीट ५० रुपये केले होते. ...

रेल्वे स्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफॉर्म तिकीट ३०, पार्किंग १० रुपये
परभणी रेल्वे स्थानक येथे कोरोनापूर्वी १० रुपये प्लॅटफॉर्मचे टिकीट होते. कोरोनाकाळात रेल्वे बोर्डाने हे तिकीट ५० रुपये केले होते. यानंतर साधारण एक वर्षांनी एप्रिल २०२१ मध्ये प्लॅटफॉर्म तिकीट ३० रुपये केले. सध्या २५ विशेष रेल्वे या स्थानकावरुन सुरू आहेत. यात ३ पॅसेंजरचाही समावेश आहे. तसेच काही रेल्वेंना साधारण आरक्षणाविना प्रवासासाठीचे डबे जोडले आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे लक्षात घेता रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीट कमी करणे गरजेचे आहे. स्थानकावर सोडायला आलेल्याला प्लॅटफॉर्म आणि वाहन पार्किंग असे दोन्ही मिळून ४० रुपये खर्च करावे लागत आहेत, यापेक्षा दुसऱ्या गावाला जाऊन आलेले पुरते, अशी चर्चा नागरिकातून ऐकावयास मिळत आहे.
प्लॅटफॉर्म तिकीटातून रेल्वेची कमाई
प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीतून रेल्वेची मोठ्या प्रमाणावर कमाई होते. ही बाब परभणीमध्ये मात्र उलटी आहे. येथे सहसा कोणी प्लॅटफॉर्म तिकीट काढत नाही तसेच प्लॅटफॉर्म तिकीटाची तपासणीही कोणी करीत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला स्थानकात जाण्यापुर्वी प्लॅटफॉर्म तिकीट काढल्याशिवाय अजूनही ध्वजावत नाहीत, हे दिसून येते.
पार्किंग सर्वात महाग
परभणी रेल्वे स्थानकाच्या समोर मोकळ्या जागेत दुचाकी तसेच चारचाकी वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध आहे. ही जागा निविदा पद्धतीने पार्किंगसाठी कंत्राटदाराला ठराविक कालावधीसाठी देण्यात आली आहे. दर २ तासाला १० रुपये याप्रमाणे येथे आकारणी केली जाते. अवघ्या ५ मिनिटाच्या कामासाठी तसेच आरक्षण काढण्यासाठी आल्यावर सुद्धा १० रुपये मोजण्याची वेळ अनेकांवर येत आहे. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटापेक्षा पार्किंग वाल्याची कमाई जास्त होत असल्याचे पहावयास मिळते.
असे वाढले दर
२०१९ १० रुपये १० रुपये
२०२० ५० रुपये १० रुपये
२०२१ ३० रुपये १० रुपये
गावी जाऊन सोडणे परवडले
नातेवाईक किंवा मित्र तसेच कोणाला घ्यायला रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पार्किंगचे पैसे काही मिनिटांसाठी भरावे लागत आहेत. - वीरेंद्र लाठकर.
नांदेड किंवा पूर्णा जाण्यासाठी ३५ रुपये तिकीट लागत आहे. एवढे पैसे परभणीत केवळ एखाद्याला सोडण्यासाठी आल्यानंतर स्थानकाबाहेर आणि स्थानकात प्रवेश करताना पार्किंग व प्लॅटफॉर्मसाठी मोजावे लागत आहेत. - नितीन शिंदे.
निशुल्क पार्किंगला जागा द्या
रेल्वे स्थानकाबाहेर नो-पार्किंगचे बोर्ड जागोजागी लावले आहेत. यामुळे वाहन लावायला जागा नाही. यात पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त वाहन लावल्यास पोलीस वाहन उचलून नेतात. यामुळे पैसे देऊन वाहन लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याकरिता स्वतंत्र निशुल्क पार्किंगला जागा द्यावी, अशी मागणी होत आहे.