निरीक्षक वैधमापनशास्त्र कार्यालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:06+5:302020-12-12T04:34:06+5:30
देवगाव फाटा: स्थानिक बाजारपेठेतील विविध अस्थापनेतील वजन व मापात होणारी ग्राहकांची फसवणूक थांबविण्यासाठी व या अनुषंगाने संबंधित अस्थापनाची तपासणी ...

निरीक्षक वैधमापनशास्त्र कार्यालय कुलूपबंद
देवगाव फाटा: स्थानिक बाजारपेठेतील विविध अस्थापनेतील वजन व मापात होणारी ग्राहकांची फसवणूक थांबविण्यासाठी व या अनुषंगाने संबंधित अस्थापनाची तपासणी करण्यासाठी सेलू शहरातील आदर्शनगर येथे खासगी जागेत निरीक्षक वैधमापनशास्त्र कार्यालय आहे. हे कार्यालय शुक्रवारी १०.३६ वाजता कुलूपबंद असल्याचे सदरील प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याच्या तक्रारी वाढल्याने येथील कामकाज या कार्यालयाचे चालते तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत येणारे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र (वजन व मापे कार्यालय) सेलू अंतर्गत सेलू, मानवत, पाथरी व जिंतूर तालुक्याचा कारभार पाहिला जातो. या सर्व कार्यक्षेत्रातील आडत व्यापारी, किराणा दुकान, स्वस्तधान्य दुकान व सोनाराचे यांच्याकडील वापरात असलेली वजनमापे यांची पडताळणी करणे, त्या वजन मापावर मुद्रांक करण्याची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. सध्या बाजारपेठेत सदोष वजनकाटे असल्याने ग्राहकांची वजन व मापांमध्ये होणारी फसवणूक थांबविण्याचे काम या कार्यालयाकडून पाहिले जाते. मात्र हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याच्या तक्रारी सेलू शहरासह तालुक्यात वाढल्या आहेत. या अनुषंगाने सदर प्रतिनिधीने शुक्रवारी सकाळी ११.३६ वाजता पाहणी केली, तेव्हा हे कार्यालय कुलूपबंद अवस्थेत दिसून आले. त्यामुळे हे कार्यालय सुरु असते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सहा महिन्यात नेमक्या किती अस्थापनांची तपासणी केली, फी किती वसूल झाली, किती जण दोषी आढळले, त्यांच्यावर काय कारवाई झाली, याबाबत मात्र शुक्रवारी या कार्यालयाकडून माहिती मिळाली नाही. प्रत्यक्षदर्शी हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार कागदोपत्रीच पाहिला जातो की काय असा प्रश्न सेलूकरांमधून उपस्थित केला जात आहे.
शिबिराला खो
वजन व माप विषयक अधिनियमन व नियमांच्या तरतुदीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून निरीक्षक वैधमापनशास्त्र कार्यालयाची जबाबदारी आहे. या कार्यालयाकडून वजन, मापे तपासणी करता जनजागृतीसाठी शिबिरे आयोजित केली जातात. मात्र या कार्यालयाकडून अद्याप एकही शिबिर आयोजित केलेले नाही. त्याच बरोबर फी स्वरुपात महसूलही जमा होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यालयात निरीक्षण वैधमानपन शास्त्र निरीक्षक म्हणून सचिन खडीकर तर सेवक म्हणून सुभाष जाधव हे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा उपयोग काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
‘सेलू विभाग कार्यालयांर्तगत सेलू, मानवत, पाथरी व जिंतूर हे चार तालुके येतात. या व्यतिरिक्त माझ्याकडे परभणी, पूर्णा व वसमत या तीन तालुक्याचा अतिरिक्त कारभार आहे. आमचे काम फिल्डवर असते. त्यामुळे कोणते कार्यालय कधी उघडे असेल, हे मी सांगू शकत नाही. ३६५ दिवस ऑफिस बंद राहू शकते. मी राजपत्रित वर्ग २ चा अधिकारी आहे. तुम्हाला माहिती हवी असेल तर माझी अपॉईमेंट घ्या. मी साधारण माणूस नाही. मी जेव्हा वेळ देईल, तेव्हा मला भेटायला या. तुम्ही माझ्या कार्यालयातील कामाची चौकशी करु शकत नाहीत.
-सचिन खडीकर, निरीक्षक, वैधमापन शास्त्र कार्यालय