माहूर : येथील रामगढ किल्यात झालेल्या दुहेरी खून प्रकरणाने सबंध जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली होती. मात्रमुख्य सुत्रधार रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर हा फरार होता. त्यास यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथून शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी शिताफीने अटक केली. रामगढ किल्यातील हत्ती दरवाजा ते बारुदखाना जाणार्या पायवाटेवर पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थीनी निलोफर बेग व शाहरुख खान फिरोजखान पठाण या दोघांचा मृतदेह १0 ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. शरीरावर कुर्हाड व चाकूचे वार करुन निघृण खून झाल्याची बाब तपासात पुढे आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. यातील गुंता वाढत गेल्याने अधिक तपासासाठी पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविली. खून प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. यापैकी राजू उर्फ राजा रघूनाथ गाडेकर, शेख जावेद पेंटर शेख हुसेन, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे या पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य सूत्रधार रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर हा फरार होता. त्याची सासरवाडी यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथील असल्याने तो तेथे जाण्याची शक्यता बळावली. पोलिस निरीक्षक डॉ. अरुण जगताप यांनी घाटंजी येथील ठाण्याशी संपर्क करुन आरोपीची फोटो पाठवून पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते. सहायक पोलिस निरीक्षक एल.डी. तावरे यांनी सदरील आरोपी पारवा येथे असल्याची माहिती माहूर पोलिसांना दिली. आरोपीच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक जगताप यांच्या पथकातील सपोनि. जगदिश गिरी, रमेश गावंडे, पी.एम. गेडाम, बंडू जाधव, संतोष गडपवार, दत्ता पेंदोर, सपोनि अविनाश केरी, गुणवंत सलाम, स्वाधीन ढवळे, सय्यद सिराज, पांडूरंग गुरनुले, पारवा येथील सपोनि. तावरे, गणेश घोसे, गजानन नव्हाते, दशरथ कुमरे, मंगेश वळसकर, योगेश सलामे, राजू शेंडे यांनी शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास रघू रोकडाचे सासरे बाकाराम पाडाले याच्या घरातून ताब्यात घेतले. खून प्रकरणी सुपारी देण्यामागे कोणाचा हात आहे? याचा तपास घेणे स्थानिक गुन्हा शाखेला सोयीचे होणार आहे. /(वार्ताहर) |