निधी देवूनही कामे करण्यास उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:58+5:302021-03-26T04:17:58+5:30
करपरा मध्यम प्रकल्पासाठी निवळी येथे ग्रामस्थांच्या शेत जमिनीचे संपादन करण्यात आले. परंतु, या ग्रामस्थांचे पुनर्वसन गैरसोयीचे करण्यात आले. निवळी ...

निधी देवूनही कामे करण्यास उदासीनता
करपरा मध्यम प्रकल्पासाठी निवळी येथे ग्रामस्थांच्या शेत जमिनीचे संपादन करण्यात आले. परंतु, या ग्रामस्थांचे पुनर्वसन गैरसोयीचे करण्यात आले. निवळी येथील करपरा नदीवर बांधलेल्या या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने २१ डिसेंबर २०१० मध्ये ९ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून सांडव्यास आरसीसी जॅकेटींग करणे, स्टींलिंग बेसिंगचे काम करणे, मुख्य कालवा ० ते २ किमी मध्ये आरसीसी अस्तरीकरण करणे, मुख्य कालवा, ० ते २४ किमी मधील विमोचक, वितरिकेची दुरुस्ती व पुनरस्थापना करणे, गाईड बंद लगत रिटेनिंग व्हॉल्व्ह बांधकाम करणे आदी कामांचा अंतरभाव आहे. प्रकल्पाचा मुख्य कालवा काळ्या मातीच्या भूस्तरावरून उंचवट्यावरून जातो. तर खोलगट भागात मातीचा भराव टाकून मुख्य कालवा निर्माण केला आहे. सुरुवातीच्या दोन किमी लांबीत कालवा पाझरामुळे जमीन चिभड होवून खराब होत आहे. पिकास दिलेले खत पाण्यामुळे वाहून जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे मुख्य कालव्याच्या दोन किमी अंतरापर्यंत अस्तरीकरण केल्यास जमीन खराब होणार नाही. तसेच पाण्यामुळे होणारे नुकसान टळेल. या बाबी विचारात घेवून ५२ लाख २२ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, अद्यापही हे काम सुरू झाले नाही. निधी प्राप्त होवून १५ वर्षांचा कालावधी उलटला असून, कामे रखडलेली आहेत. या संदर्भात निवळी येथील प्रा. डॉ. पांडुरंग ठोंबरे यांनी जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल घेतली नाही. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी निवदेनाद्वारे ही परिस्थिती मांडली आहे. तेव्हा उपलब्ध निधीमधून कामे सुरू करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.