देशात गेल्या काही महिन्यांत केंद्र शासनाकडून इंधन दरवाढीबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ६२० रुपयांना १४ किलो ग्रॅम वजनाचे गॅस सिलिंडर मिळत होते. हेच सिलिंडर मार्च २०२१ मध्ये ८४५ रुपयांना झाले. देशातील ५ राज्यातील निवडणुकांची मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतावर डोळा ठेऊन गॅस सिलिंडरच्या दरात फक्त दहा रुपयांची कपात करीत स्वस्ताईचा देखावा निर्माण केला आहे. असे असले तरी महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
डिसेंबर महिन्यात तब्बल १०० रुपयांची झाली वाढ
गेल्या सहा महिन्यांत डिसेंबर २०२० मध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांची वाढ करण्यात आली आली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ७५ रुपयांची, तर मार्च २०२१ मध्ये ५० रुपयांची वाढ केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत मात्र कसल्याही प्रकारची दरवाढ करण्यात आली नाही.
इंधन दरवाढीमुळे आगोदरच महागाई वाढली असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हा गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पाच, दहा रुपयांची वाढ समजून घेऊ शकतो; तब्बल २२५ रुपयांची वाढ करणे चुकीचे आहे.
-नंदा राठोड, गृहिणी
कोरोनामुळे अगोदरच घरात येणाऱ्या पैशांवर परिणाम झाला आहे. अशात सरकार सतत गॅसच्या किमती वाढवत असल्याने सर्वसामान्याने जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नाचे काहीही घेणे देणे दिसत नाही. त्यामुळे सारखी महागाई केली जात आहे.
-सुनीता घाटे, गृहिणी
गेल्या वर्षी ६१५ रुपयांना मिळणाऱ्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात आता मोठी वाढ केली आहे. दर महिन्याला घरखर्चासाठी ठराविक रक्कम मिळत असते. आता बाजारात सर्वच महाग झाले आहे. त्यात गॅसही महागला आहे, मग आता चुलीवरच स्वयंपाक करावा की काय? असा प्रश्न पडलाय.
-रोहिनी पितळे, गृहिणी