परभणी, गंगाखेड तालुक्यामध्ये वाढली रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:47+5:302021-03-26T04:17:47+5:30
परभणी : मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्ग काळात परभणी आणि गंगाखेड तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती ...

परभणी, गंगाखेड तालुक्यामध्ये वाढली रुग्णसंख्या
परभणी : मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्ग काळात परभणी आणि गंगाखेड तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेला कोरोना संसर्ग डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या काळात कमी झाला होता; परंतु फेब्रुवारी महिन्यापासून हा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण ११ हजार ६३७ रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण परभणी तालुक्यातील आहेत. परभणी तालुक्यात सहा हजार १५९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यामध्ये एक हजार ८८८ रुग्ण आढळले आहेत. जिंतूर तालुक्यात ९८८, मानवत ५११, पालम २८५, पाथरी ३८२, पूर्णा ७५४, सेलू ९१ आणि सोनपेठ तालुक्यातील २४५ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. परभणी आणि गंगाखेड या दोन तालुक्याव्यतिरिक्त जिंतूर, पूर्णा, मानवत आणि सेलू तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. सध्या बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या तालुकास्तरावरील कोरोना रुग्णालयात एकही रुग्ण उपचार घेत नाही. सर्व रुग्णांवर परभणी शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. काही खासगी रुग्णालयात तर बेड शिल्लक नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात विक्रमी रुग्णसंख्या
मागील वर्षीच्या संसर्गापेक्षा यावर्षी दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग अधिक झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यात तीन हजार १९ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक दोन हजार ५७४ रुग्ण नोंद झाले होते. ऑगस्ट महिन्यात दोन हजार १४४ रुग्णांची नोंद होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी झाली होती; परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे.
रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.९९ टक्के
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.९९ टक्के एवढे आहे. मार्च महिन्यामध्ये ३४ हजार ६९३ नागरिकांच्या तपासण्या झाल्या. त्यामध्ये तीन हजार ११९ रुग्ण आढळले. हे प्रमाण ८.९९ टक्के एवढे आहे. मात्र मागील वर्षी जुलै महिन्यातील रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३०.२८ टक्के एवढे अधिक होते. जुलैमध्ये एक हजार ९९५ नागरिकांच्या तपासण्या झाल्या. त्यात ६०४ रुग्ण आढळले तर ऑगस्ट महिन्यात नऊ हजार २३० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये दोन हजार १४४ रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यातील हे प्रमाण २३.२३ टक्के एवढे आहे.