फैलाव रोखण्यासाठी सरपंच सदस्यांकडून वाढलेल्या अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST2021-05-10T04:16:51+5:302021-05-10T04:16:51+5:30
परभणी : ग्रामीण भागात पसरत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात सरपंच आणि ग्रामपंचायत ...

फैलाव रोखण्यासाठी सरपंच सदस्यांकडून वाढलेल्या अपेक्षा
परभणी : ग्रामीण भागात पसरत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग वाढविण्यास फैलाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
कोरोना संसर्ग आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. अनेक गावांमध्ये या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात अनेक रुग्ण सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणे जाणवल्यानंतरही रुग्णालयात दाखल होत नाहीत. घरगुती उपचार करून हा आजार बरा होईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र चार ते पाच दिवसांनंतर अत्यवस्थ वाटू लागल्यानंतरच हे रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.
हा फैलाव थांबविण्यासाठी आणि सर्दी-खोकला-ताप अशा रुग्णांना शोधण्यासाठी प्रशासनाने ८ मेपासून गाव पातळीवर सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणात तलाठी, शिक्षक, आशा सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण यशस्वी होऊन कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर त्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेणे आवश्यक आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला तर ग्रामस्थ पुढे येऊन शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करतील. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी सरपंच, ग्रापंचायत सदस्य या गाव पुढाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गाव पातळीवरील पुढाऱ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला तरच हे सर्वेक्षण यशस्वी होऊन ग्रामीण भागात पसरलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.
तालुका स्तरावर बैठका सुरू
कोरोना फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यासाठी सध्या तालुकास्तरावर बैठका घेतल्या जात आहेत. तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून जास्तीतजास्त रुग्ण समोर येतील आणि त्यांच्यावर कोरोनाचे उपचार योग्य वेळेत होऊन संसर्ग आटोक्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.