एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST2021-02-11T04:18:57+5:302021-02-11T04:18:57+5:30
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आरक्षण तिकीट काढण्यासाठी एकच खिडकी सुरू ठेवण्यात आली आहे. अलिकडच्या काळात रेल्वे गाड्यांची ...

एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आरक्षण तिकीट काढण्यासाठी एकच खिडकी सुरू ठेवण्यात आली आहे. अलिकडच्या काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली जाते. त्यामुळे प्रवाशांना रांग लावून आरक्षण तिकीट काढावे लागत आहे. रेल्वे गाड्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता, तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
वाहनतळाअभावी वाहतूक विस्कळीत
परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा नसल्याने बसस्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे स्थानकातून बस बाहेर काढताना आणि स्थानकात बस आणताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात चालवले जाते. या भागात वाहनतळाचीही स्वतंत्र सुविधा निर्माण करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
परभणी : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सुपर मार्केट ते नवा मोंढा हा रस्ता असाच खड्डेमय झाला आहे. कारेगाव रोड भागातील २५ ते ३० वसाहतींसाठी हा प्रमुख रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जलवाहिनी जोडण्याचे काम लांबले
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यान परिसरातील जलकुंभाला जलवाहिनी जोडण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. सहा दिवसात हे काम पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा प्रशासनाने जलवाहिनी जलकुंभाला जोडण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाण्याअभावी वाळू लागली झाडे
परभणी : शहरातील जिंतूर रस्ता आणि वसमत रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे वाळू लागली आहेत. जिल्ह्यात आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे दुभाजकावरील झाडांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपा प्रशासनाने दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शासकीय कार्यालयात वाढली अस्वच्छता
परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरश्या उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.