दीड हजार पानांतून साकारली बाबासाहेबांची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:21+5:302021-04-16T04:16:21+5:30
परभणी : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणीत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले असून, येथील कलाकारांनी विविध ...

दीड हजार पानांतून साकारली बाबासाहेबांची प्रतिमा
परभणी : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणीत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले असून, येथील कलाकारांनी विविध झाडांच्या १ हजार ५१५ पानांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे.
१४ एप्रिल रोजी जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अभिवादनाचा प्रयत्न केला. असाच एक प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. येथील परभणी युवा मंच आणि डी ७ आर्टच्या कलाकारांनी विविध झाडांच्या पानांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली. यासाठी १ हजार ५१५ पानांचा वापर करण्यात आला. १२ तासांच्या अथक प्रयत्नातून या कलाकृतीचे सादरीकरण करण्यात आले. परभणी युवा मंचचे अध्यक्ष अमोल लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी प्रमोद उबाळे, एम. व्ही. आडे, रोहिनी सावंत, अंबिका गायकवाड, ज्योती रन्हेर, माया काळे, वैष्णवी साबळे, ज्ञानेश्वर सांगळे या कलाकारांनी ही प्रतिमा साकारली. या प्रतिमेचे उद्घाटन शेकापचे जिल्हाध्यक्ष भाई किर्तीकुमार बुरांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राहुल कांबळे, अमोल लांडगे, राहुल वहिवाळ, प्रमोद पंडित, शुभम तालेवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण माने, महेश रेंगे, प्रसाद जाधव, प्रा. एकनाथ भालेराव, शेख कलीम आदींनी प्रयत्न केले.