अरुणची व्यंगत्वावर आदर्श मात

By Admin | Updated: December 23, 2014 23:54 IST2014-12-23T21:19:38+5:302014-12-23T23:54:46+5:30

बीडचा उसतोड कामगार : एक पाय नसतानाही जगण्याची, कष्ट करण्याची तीव्र इच्छा

Ideal for Arun's disgrace | अरुणची व्यंगत्वावर आदर्श मात

अरुणची व्यंगत्वावर आदर्श मात

गणपती कोळी - कुरुंदवाड माणसाला एखाद्या अवयवांचे व्यंगत्व आले की, मानसिकदृष्ट्या खचून जातो. यातून काहीजण जीवनही संपवितात, मात्र एक पाय नसतानाही जगण्याची व कष्ट करण्याची तीव्र इच्छा यातून केवळ कुबडीच्या सहायाने अरुण शंकर जाधव (वय २७, रा. कल्याणनगर, ता. माजलगाव, जि. बीड) तो गेली कित्येक वर्षे ऊसतोड मजुरी करीत आहे. व्यंगत्वावर मात करत पत्नी व तीन मुलांच्या संसाराचा गाडा यशस्वीपणे चालवित आहे. व्यंगत्वाने खचून जाणाऱ्या व व्यंगत्वाचे कारण सांगून भीक मागून जगणाऱ्यांसाठी अरुणचा आदर्श घेण्यासारखा आहे. घरी अठराविश्वे दारिद्र्य. शेतीवाडी नसल्याने दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केल्याशिवाय घरची चूल पेटत नाही. त्यातही दुष्काळी भाग; त्यामुळे शंकर जाधव यांची ऊसतोडणीसाठी कोयत्याशी गाठ पडली. कष्टमय जीवन जगत असताना शंकर यांना अरुण हा एकुलता मुलगा आहे. मात्र, संघर्षमय जीवनही नियतीला मान्य नव्हते. अरुण दोन वर्षांचा असतानाच पोलिओ झाल्याने एका पायाला कायमचेच व्यंगत्व आले. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अरुणला समजण्या-उमजण्याआधीच त्याचे जीवन उसाच्या फडात पालापाचोळ्यात घडले. त्यामुळे बालपणापासूनच त्याची मैत्री ऊस तोडण्याच्या कोयत्याशी झाली. एक पाय निकामी झाला, तरी काय झाले. दोन हात, एक पाय सदृढ आहे. त्यामुळे व्यंगत्व आलेल्या एका पायावर मात करतो, इतका त्याला आत्मविश्वास आल्याने बालपणात विठी-दांडू घेण्याआधी कुबडी घेऊन त्याच्या सहायाने ऊसतोडी करत आई-वडिलांना मदत करू लागला. त्यामध्ये तो इतका पारंगत झाला की, इतर मजुरांच्याबरोबर सहज ऊसतोड करीत आहे. त्यामुळे एक पाय नसल्याची खंतही त्याला जाणवत नाही. त्याच्या कामात त्याची पत्नी सुमित्रा त्याला मदत करत असून, त्यांना तीन लहान मुलेही आहेत. मुलांच्या वाट्याला असले कष्टप्रद जीवन येऊ नये यासाठी पती-पत्नी दोघेही रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. अरुण इतरांच्या बरोबरीने ऊस तोडत असला, तरी तोडलेले ऊस पायाअभावी वाहनात भरता येत नाहीत. म्हणून कंत्राटदाराकडून त्याला निम्मा पगार (अर्धा गडी) मिळत असल्यानेच त्याला अपंगत्वाची जाणीव होते.

Web Title: Ideal for Arun's disgrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.