अतिवृष्टीने ढासळले शेकडो पूल; वाहतूक ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:11+5:302021-09-14T04:22:11+5:30

परभणी : जिल्ह्यातील शेकडो पुलांची अतिवृष्टीने मोठी हानी झाली असून, आठवडाभरानंतरही अनेक पुलांवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. महसूल प्रशासनाने ...

Hundreds of bridges collapsed due to heavy rains; Dangerous traffic | अतिवृष्टीने ढासळले शेकडो पूल; वाहतूक ठरतेय धोकादायक

अतिवृष्टीने ढासळले शेकडो पूल; वाहतूक ठरतेय धोकादायक

परभणी : जिल्ह्यातील शेकडो पुलांची अतिवृष्टीने मोठी हानी झाली असून, आठवडाभरानंतरही अनेक पुलांवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. महसूल प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. मात्र, खराब झालेल्या पुलांच्या दुरुस्तीचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. निधी नसल्याने रस्ते आणि पुलांची दुरुस्ती जिल्ह्यात रखडली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात दोन वेळा आणि सप्टेंबर महिन्यात एक वेळा अतिवृष्टी झाली. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात अतिवृष्टी झाली. एकूण २३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. त्यातच ओढे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले. अतिवृष्टी होऊन आता आठवडाभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले नाही. पाथरी, पालम, गंगाखेड आणि सेलू या तालुक्यात या तालुक्यात पुराने थैमान घातले.

पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परभणी-पाथरी, परभणी-गंगाखेड या मुख्य रस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प झाले होेते. तर ग्रामीण भागात अनेक ओढे, नाल्यांना पूर आल्याने पुलाचे कठडे खचले आहेत. भराव वाहून गेला आहे. तर पुलावरील रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे आजही या मार्गावरील वाहतूक सुरळीत तर झाली नाही. परंतु धोकादायकही बनली आहे. त्यामुळे या पुलांची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न आहे.

पन्नासहून अधिक पुलांची हानी

पाथरी, पालम आणि सेलू या तीन तालुक्यांमध्ये ५० हून अधिक पुलांची हानी झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती.

पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. या तालुक्यातील परभणी-पालम राष्ट्रीय महामार्गावरील जवळा गावाजवळ पुलाचा भराव वाहून गेला आहे. आजही जडवाहतूक बंद आहे. त्याचप्रमाणे पालम- गंगाखेड या मार्गावरील केरवाडी गावाजवळ दोन्ही बाजूने पुलाला मोठे खड्डे पडले असून, वाहतूक धोकादायक झाली आहे. शिवाय पालम-बनवस, आरखेड-सोमेश्वर, पालम-फळा आदी मार्गावरील १२ ते १३ पुलांचे नुकसान झाले आहे.

पाथरी तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे खेर्डा, वडी, गुंज, वाघाळा, तुरा या गावांजवळील पूल खचले आहेत. तर सेलू तालुक्यात कुपटा, हातनूर, ढेंगळी पिंगळगाव या ग्रामीण भागातील पुलांसह देवगावफाटा-सेलू मार्गावरील मोरेगाव येथील नवीन पुलाचाही भराव वाहून गेला आहे.

जुलैमध्ये मागितले २४ कोटी

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४०४ पुलांची हानी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या पुलांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांची मागणी राज्य शासनाकडे नोंदविण्यात आली होती. या महिन्यात तालुक्यातील १०५ पुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे परभणी ७४, जिंतूर ४६. सेलू ५८, पाथरी ४४, मानवत ४९ आणि सोनपेठ तालुक्यातील २८ पुलांची हानी झाली होती. या पुलांच्या दुरुस्तीसाठी मागितलेला निधीच अद्याप मिळाला नाही. त्यात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीची भर पडली आहे.

Web Title: Hundreds of bridges collapsed due to heavy rains; Dangerous traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.