बालरोग तज्ज्ञ यांची फौज असताना तिसरी लाट रोखणार कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:25+5:302021-05-28T04:14:25+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता आरोग्य ...

बालरोग तज्ज्ञ यांची फौज असताना तिसरी लाट रोखणार कशी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील सध्याची आरोग्य यंत्रणा लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांची संख्या कमी आहे. येथील जिल्हा रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ अधिकारीच उपलब्ध नसतील तर तिसरी लाट थांबवायची तरी कशी? असाही प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत एकही बालरोग तज्ज्ञ पद भरलेले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहोचला तर उपचार कसे करावेत? ही समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालय अंतर्गत गंगाखेड आणि सेलू या दोन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञांचे पदच रिक्त असल्याने संभाव्य साथ रोखण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तर या विभागात वाणवा आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती झाली ; परंतु त्या ठिकाणी देखील पद मंजूर झाली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची स्थिती अत्यंत वाईट आहे. संभाव्य कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सर्वप्रथम पदभरती करणे गरजेचे झाले आहे.
वैद्यकीय साधनांची करावी लागणार जुळवाजुळव
कोरोनाची संभाव्य लाट बालकांवर परिणाम करणारी असल्याने या संदर्भाने वैद्यकीय साधनांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे. बालकांसाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, मास्क तसेच बालकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी औषधी उपलब्ध करावी लागणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने एका समितीची स्थापना केली आहे ; परंतु अद्याप या समितीने त्यांचा अहवाल दिलेला नाही. सध्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात बाल रुग्ण कक्ष सुरू करण्याची तयारी सुरु आहे.
४०० खाटांचा स्वतंत्र बालकांसाठी कक्ष उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात हा कक्ष सुरू केला जाणार आहे. संभाव्य लाटेतून बालकांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा कमी पडू नये, या उद्देशाने प्रशासकीय तयारी सुरू आहे.
ग्रामीण भागातील संभाव्य कोरोना लाट रोखण्याच्या उद्देशाने दोन दिवसांपूर्वीच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बालरोग तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी