माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:07+5:302021-08-23T04:21:07+5:30
परभणी : दहावीचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटला असला, तरी या निकालातून मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल आहे. परीक्षा ...

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
परभणी : दहावीचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटला असला, तरी या निकालातून मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल आहे. परीक्षा झाल्या असत्या तर अधिक गुण मिळाले असते, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.
परीक्षेची चांगली तयारी करूनही अपेक्षित गुण मिळाले नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी विद्यार्थ्यांची समज कशी काढणार? असा प्रश्न आहे.
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींच्या गुणांची पडताळणी केली.
या पडताळणीत मी हुशार असताना मला कमी गुण आणि माझ्या मित्राला अधिक गुण कसे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दहावी इयत्तेसाठी निवडलेल्या मूल्यांकन पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत वापरलेली मूल्यांकन पद्धत योग्यच आहे. अनेक विद्यार्थी नववीला जास्त अभ्यास करीत नाहीत. त्यांचे मात्र नक्कीच नुकसान झाले आहे. तसेच जे विद्यार्थी खूप काही ध्येय ठेवून होते, त्यांची मात्र निराशा झाली आहे.
- दिलीप बिनगे, पालक
प्रस्तुत परिस्थितीत पर्याय उपलब्ध नसल्याने वापरलेली मूल्यांकन पद्धत योग्यच आहे. गुणपत्रिका बघताना गुणांची ढगफुटी झाली आहे, हे लक्षात येते. माझ्या निरीक्षणानुसार खरी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाही तर लाभच झाला आहे.- कल्याण देशमुख, पालक
परीक्षा घेतली असती तर नक्कीच चांगले गुण मिळाले असते. काही विद्यार्थ्यांना अपेक्षापेक्षा जास्त गुण मिळाले, तर काहींना कमी. बऱ्याच वेळा नववीला जास्त तयारी नसते; पण दहावीच्या परीक्षेसाठी बरीच तयारी केलेली असते. त्यामुळे परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. - हर्षदा कच्छवे
लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणातही आम्ही मनापासून अभ्यास केला; पण परीक्षाच झाली नाही. जर परीक्षा झाली असती तर आता जे मला गुण मिळाले आहेत, त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असते. त्यामुळे परीक्षा व्हायलाच पाहिजे होती, असे मला वाटते.
- अनुष्का सुरेश हिवाळे