गृहकर्ज स्वस्त झाले, मात्र बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घराचे स्वप्न दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST2021-07-29T04:18:52+5:302021-07-29T04:18:52+5:30
परभणी : विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्जासाठी व्याजदरात घट केली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम साहित्याचे दर मात्र वाढले आहेत. ...

गृहकर्ज स्वस्त झाले, मात्र बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घराचे स्वप्न दूर
परभणी : विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्जासाठी व्याजदरात घट केली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम साहित्याचे दर मात्र वाढले आहेत. त्यामुळे घर बांधकाम करताना नागरिकांना नाकीनऊ येत आहेत.
कोरोनाच्या संसर्गानंतर जिल्ह्यात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचा परिणाम बांधकाम साहित्याच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
गावापासून दूर घरे स्वस्त; पण जाणे-येणे महाग
शहरी भागात घर असणे हे अनेकांचे स्वप्न आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसायात मंदीचे सावट आहे.
प्लॉटिंग व्यवसायातही अशीच स्थिती आहे. शहराच्या मुख्य भागात जागा मिळणे अवघड आहे. या ठिकाणचे दरही अधिक आहेत.
शहरापासून दूर अंतरावर सध्या प्लॉटिंग होत आहे. या प्लॉटचे दर शहरातील जागांपेक्षा तुलनेने कमी आहेत; परंतु, शहरापासून दूर अंतरावर प्लॉट घेतल्यास वाहतुकीचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे प्लॉटिंग व्यवसायालाही अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
मागच्या नोद वर्षांत बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. सिमेंट, विटा, वाळूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
- शेख रशीद
कोरोनाच्या संसर्गानंतर जिल्ह्यात बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. कोरोनापूर्वी ज्यांनी बांधकामे सुरू केली. त्यांची मात्र, अडचण होत आहे.
- अब्दुल करीम
मध्यंतरी वाळूचे दर कमी झाले होते. त्यामुळे बांधकाम सुरू केले; परंतु आता वाळूचे दर वाढले आहेत. शिवाय सिमेंट, विटा, स्टीलचे दरही वाढल्याने बांधकाम टप्याटप्याने करावे लागत आहे.- व्यंकटेश मालेवार
बांधकामाचे साहित्य महागले आहे. त्यामुळे घर बांधकामासाठी अपेक्षित ठेवलेल्या खर्चापेक्षाही अधिक खर्च लागत आहे. परिणामी बांधकाम लांबणीवर पडत आहे. - नितीन डावरे