मृत्यू दर अधिक तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:13+5:302021-05-01T04:16:13+5:30

राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, मराठवाड्यातही दररोज शेकडो बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली ...

The higher the mortality rate, the lower the patient's recovery rate | मृत्यू दर अधिक तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी

मृत्यू दर अधिक तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी

राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, मराठवाड्यातही दररोज शेकडो बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याची स्थिती वाईट असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार मराठवाड्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे सर्वात जास्त प्रमाण औरंगाबाद जिल्ह्याचे आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.९२ टक्के असून, सर्वात वाईट कामगिरी परभणी जिल्ह्याची आहे. परभणीचा रिकव्हरी रेट ७६.७९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्यात विभागात हिंगोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.४० टक्के आहे. तसेच नांदेड जिल्ह्याचा ८२.८४ टक्के, जालना ८२.०९ टक्के, उस्मानाबाद ७८.९१ टक्के, बीड ७७.६९ टक्के, तर सातव्या क्रमांकावरील लातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७७.२२ टक्के आहे.

एकीकडे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण कमी असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर मात्र मराठवाड्यात सर्वाधिक आहे. परभणीचा मृत्यूदर २.४६ टक्के आहे. त्यानंतर उस्मानाबाद २.२७, नांदेड २.०८, औरंगाबाद २.०२ टक्के, हिंगोली १.८० टक्के, बीड १.७५ टक्के, लातूर १.७३ टक्के आणि जालना जिल्ह्याचा सर्वात कमी म्हणजे १.६२ टक्के मृत्यू दर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार पद्धतीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. औरंगाबादसारख्या मोठ्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असताना हे परभणी जिल्ह्यात का शक्य होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

संपर्कातील व्यक्ती शोधण्यात मागेच

कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रशासनाचे आहे. परंतु यामध्येदेखील परभणी जिल्हा मागेच आहे. जिल्ह्याचे कॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ५.९० टक्के आहे. त्या तुलनेत जालना जिल्ह्याचे सर्वाधिक म्हणजे १९.१६ टक्के, बीडचे १७.६७ टक्के, हिंगोली १७.१२ टक्के, नांदेड १६.६८ टक्के, औरंगाबाद १२.४९ टक्के, लातूर ११.६७ टक्के, तर उस्मानाबद जिल्ह्याचे प्रमाण ९.१८ टक्के आहे.

Web Title: The higher the mortality rate, the lower the patient's recovery rate