परभणी : जिल्ह्यात ५२ पैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, गोदावरी, करपरा नदीकाठच्या अनेक गावांना पुराने वेढले आहे. पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पाणी शेतशिवारात घुसल्याने नुकसान झाले आहे. दुधना, इंद्रायणी व पूर्णा नदीचाही काही ठिकाणी कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यातील जवळपास २८ गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे. तर, धरणांतून सुटणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावांचा पुराचा वेढा कायम राहण्याची भीती आहे. परभणी तालुक्यात इंद्रायणी नदीचे बॅकवॉटर गावात शिरल्याने इंदेवाडी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली.
सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव, लासीना येथील ६०० नागरिकांना एनडीआरएफच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. थडी पिंपळगाव, कान्हेगाव, शिरोरी या तीन गावांना गोदावरीच्या पुराचा वेढा पडला आहे. तसेच, आठ गावांचा संपर्क तुटला. तर दहा ते बारा गावांत शाळाही भरली नाही.
मानवत तालुक्यात गोदाकाठी थार, दुधनेकाठच्या टाकळी नीलवर्ण, मगर सावंगी, पारडी गावात नदीचे पाणी शिरल्याने संपर्क तुटला. संभाव्य धोका लक्षात घेता थार येथील ४०० ते ५०० जणांना स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिवृष्टीमुळे १५ ठिकाणी शाळाही बंद राहिल्या आहेत.
गंगाखेड तालुक्यात गोदावरी, इंद्रायणीचा पूर अथवा बॅकवॉटरमुळे खळी, सायळा, जवळा, मैराळ सावंगी या गावांचा संपर्क तुटला. तर, पावसामुळे ८ ते ९ गावांतील शाळाही बंद राहिल्या.
पाथरी तालुक्यात गोदाकाठावर असलेल्या नाथ्रा ते मुद्गल या पट्ट्यातील जवळपास १५ गावांना बॅकवॉटरचा फटका बसला. यातील अनेकांचा संपर्क तुटला. हजारो हेकटर शेती पाण्याखाली गेली. मूळ पात्रापासून अर्धा ते एक किमी अंतरापर्यंत तुडुंब साचला आहे. मंजरथ या गावात एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून, २०० जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. यासह अनेक गावांत शाळाही बंद होत्या.
सेलू तालुक्यातील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाली. नदीकाठच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. कसुरा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सेलू ते पाथरी महामार्ग बंद पडला. तर सेलू ते परभणी मार्गावर ढेंगळी पिंपळगाव येथील पुलावरून पाणी असल्याने हा रस्ता बंद होता. निम्न दुधनामुळे सेलू ते वालूर मार्गही बंद पडला. सेलू तालुक्यात १२० बस फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. अर्ध्यावर शाळाही यामुळे बंद राहिल्या असल्याची भीती आहे.
जिंतूरसह पूर्णा व पालम तालुक्यातही अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. येलदरी, सिद्धेश्वर धरणातून विसर्ग वाढला असून, जायकवाडीतील विसर्गामुळे उच्चपातळी बंधाऱ्यांचा विसर्ग वाढत असल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. शिवाय दुधना प्रकल्पातूनही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून सेना दलाची तुकडी मागविली असून, अतिरिक्त एनडीआरएफच्या पथकाचीही शासनाकडे मागणी केली.