कृषी विद्यापीठ भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत उद्या सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 06:57 PM2020-07-23T18:57:56+5:302020-07-23T18:59:54+5:30

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २०१५ मध्ये विविध २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Hearing tomorrow regarding irregularities in the recruitment process of Agriculture University of Parabhani | कृषी विद्यापीठ भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत उद्या सुनावणी

कृषी विद्यापीठ भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत उद्या सुनावणी

Next
ठळक मुद्देया भरती प्रक्रियेवर भाजपाचे माजी आ. विजय गव्हाणे यांनी आक्षेप घेतला. प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची तक्रार कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या २३१ जागांच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराच्या तक्रारीवर २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता या प्रकरणातील चौकशी समितीचे अध्यक्ष यांच्या कार्यालयात पुणे येथे सुनावणी होणार आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २०१५ मध्ये विविध २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये खुल्या प्रवर्गातील ११७ आणि मागासवर्गीय प्रवर्गातील ११४ जागांचा समावेश होता. यासाठी एकूण १४०० इच्छुकांनी अर्ज केले. त्यापैकी ६०० उमेदवारांचेच अर्ज पात्र ठरले. भरती प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात खुल्या प्रवर्गातील ११० तर मागासवर्गीय प्रवर्गातील  फक्त १८ जागा भरण्यात आल्या. या भरती प्रक्रियेवर भाजपाचे माजी आ. विजय गव्हाणे यांनी आक्षेप घेतला. 

भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची तक्रार कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. या तक्रारीत त्यांनी अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी निवड समितीने दिली नाही. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या १९९९ च्या कायद्याचे उल्लंघन झाले. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांना मुलाखती बोलविले गेले नाही. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या जाहिरातीला विरोधाभास करणारे निर्णय घेण्यात आले. तसेच वर्ग ४ च्या जागा भरत असताना वर्ग ३ च्या भरती प्रक्रियेचे निकष लावले गेले, असे मुद्दे गव्हाणे यांनी त्यांच्या तक्रार अर्जात मांडले. 

या प्रकरणी कृषीमंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेतील विस्तार, शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता पुणे येथील कृषी परिषदेच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीस उपस्थित राहण्याचे पत्र माजी आ.गव्हाणे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या भरती सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Hearing tomorrow regarding irregularities in the recruitment process of Agriculture University of Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.