साडेतीन हजार बेड्स वाढविण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:17+5:302021-04-15T04:16:17+5:30
मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे काम ...

साडेतीन हजार बेड्स वाढविण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना
मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. याच अनुषंगाने राज्याच्या आरोग्यसेवा संचालनालयाने अपेक्षित रुग्णवाढ लक्षात घेऊन जिल्ह्यात ३ हजार ८९८ बेड उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी यासंदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून पूर्वतयारी करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार ४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आणि १८ एप्रिल रोजी होणारी अपेक्षित रुग्णसंख्या गृहीत धरून सर्वसाधारण बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आरोग्य संचालकांच्या या सूचनेनुसार जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ४५३ होण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८२८ आयसोलेटेड बेड उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ७४० ऑक्सिजन बेड, २३९ आयसीयू बेड आणि १५९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ४५३ होण्याची शक्यता आहे. ही रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ५ हजार ७२६ बेड्स सज्ज ठेवावेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ८२८ बेड उपलब्ध असून, आणखी ३ हजार ८९८ बेडची सुविधा करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनची सुविधा असलेले ४४० बेड्स सध्या उपलब्ध आहेत. आणखी १ हजार २७८ ऑक्सिजन बेड्स उभे करावे लागणार आहेत. आयसीयू बेडच्या संख्येतही ३४४ पर्यंत वाढ करण्याची आवश्यकता आहे. एकंदर सर्व परिस्थिती पाहता या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक असून, प्रशासनाचा कस लागणार आहे.
व्हेंटिलेटर मुबलक प्रमाणात उपलब्ध
जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची संख्या मुबलक प्रमाणात आहे. १५९ व्हेंटिलेटर जिल्ह्यात उपलब्ध असून, १८ एप्रिलपर्यंत होणारी अपेक्षित रुग्णवाढ लक्षात घेता केवळ ११५ व्हेंटिलेटर्स लागू शकतात. त्यामुळे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा नाही. ४४ व्हेंटिलेटर्स जिल्ह्यात अधिक आहेत.
असे आहे नियोजन
अपेक्षित ॲक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत ५० टक्के आयसोलेटेड बेड (ऑक्सिजनविना), १५ टक्के ऑक्सिजनबेड, ३ टक्के संपूर्ण आयसीयू बेड उपलब्ध करावे लागणार आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १ टक्का व्हेंटिलेटर्सची सुविधा केली जात आहे.