घंटागाड्यांच्या कामकाजावर जीपीएसची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:35+5:302020-12-27T04:12:35+5:30
शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील ...

घंटागाड्यांच्या कामकाजावर जीपीएसची नजर
शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने मनपाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. कचरा संकलनासाठी ५५ घंटागाड्या शहरात कार्यरत असून, या सर्व घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहरात दररोज प्रभागांमध्ये या घंटा गाड्या फिरत आहेत का? कचऱ्याचे संकलन केले जाते का? यावर स्वच्छता निरीक्षक नियोजन करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक घंटागाड्यांना बसविलेल्या जीपीएस यंत्रणेच्या साह्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नियंत्रण ठेवले जाते. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे ७० वाहने असून, त्याचे दररोज नियोजन केले जाते. संकलित केलेला कचरा बोरवंड भागातील घरकचरा व्यवस्थापन प्रकल्पात टाकला जातो. या ठिकाणी पीट कंपोस्टिंग, विंड्रो कंपोस्टिंगच्या साह्याने खताची निर्मिती केली जाते. तर बायोगॅस प्रकल्पात दररोज १० टन बायोगॅस तयार केला जात आहे. पीट कंपोस्टिंगसाठी मोठा हौद तयार करण्यात आला असून, त्यापासून खत निर्मिती होत आहे.
मागील सहा महिन्यांपासून शहरातून कचऱ्याचे संकलन वाढविण्यात आले आहे. ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक असा तीव वेगवेगळ्या प्रकारचा कचरा संकलित केला जात असून, त्यातील बहुतांश कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याचे निर्मूलन करण्यात मनपाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे.
लवकरच आर.डी.एफ. प्रकल्पाची उभारणी
संकलित झालेल्या कचऱ्यावर मॅकेनिकल प्रोसेसिंग करण्यासाठी आर.डी.एफ. प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव औरंगाबाद येथील जीवन प्राधिकरणाकडे पाठिवला आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळताच बोरवंड येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रेडी ड्राय फ्यूअल या कचऱ्यापासून तयार केले जाणार आहे.
तन्वीर बेग, अभियंता, मनपा परभणी
विलग करुन कचऱ्यावर प्रक्रिया
शहरात जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. प्लास्टिक, पुठ्ठा, लोखंड अशा कचरा वेगवेगळा केला जात आहे. सध्या मॅन्युअली हे काम केले जात आहे. काही दिवसांमध्ये ॲटोमॅटिक विलगीकरणाची यंत्रणा मनपा उभारणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या वतीने देण्यात आली.