१५ दिवसांपासून शासकीय हरभरा खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST2021-04-11T04:16:57+5:302021-04-11T04:16:57+5:30
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला असला, तरी रब्बी हंगामातील ...

१५ दिवसांपासून शासकीय हरभरा खरेदी केंद्र बंद
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला असला, तरी रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग करत रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी ही पिके घेतली. सध्या या पिकांची काढणी सुरू असून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होत असल्याचे दिसून येत आहे. गंगाखेड तालुक्यातील खाजगी बाजारपेठेत हरभरा पिकाला केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाऊ लागला. त्यामुळे राज्य शासनाने गंगाखेड येथे हमीभाव खरेदी केंद्र उघडले. यासाठी १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर तालुक्यातील १ हजार ४४२ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली. त्यानंतर २३ मार्चपर्यंत ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने ३३० शेतकऱ्यांचा ३ हजार १८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून गोदामाअभावी या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या १ हजार ४४२ शेतकऱ्यांपैकी १ हजार ११२ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने याकडे लक्ष देऊन केवळ गोदामाअभावी बंद असलेले गंगाखेड येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे व प्रतीक्षेत असलेल्या १ हजार ११२ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे
गंगाखेड तालुक्यातील ३३० शेतकऱ्यांनी आपला हरभरा शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केला आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ६०० क्विंटल हरभरा विक्री करणाऱ्या १२४ शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून ८१ लाख ६० हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अजूनही २०४ शेतकऱ्यांचे देणे शासकीय हमीभाव खरेदी केंद्राकडे बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे देणे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.