दोन जिल्ह्यांचा कारभार सेवकावर
By Admin | Updated: February 13, 2015 15:25 IST2015-02-13T15:25:46+5:302015-02-13T15:25:46+5:30
दोन जिल्ह्याचा कारभार पाहणार्या वैधमापनशास्त्र कार्यालयाचे कामकाज सहाय्यक नियंत्रकाअभावी ढेपाळले असून, वजनमापे तपासणी मोहीमही थंडावली आहे.

दोन जिल्ह्यांचा कारभार सेवकावर
चंद्रमुनी बलखंडे /परभणी
दोन जिल्ह्याचा कारभार पाहणार्या वैधमापनशास्त्र कार्यालयाचे कामकाज सहाय्यक नियंत्रकाअभावी ढेपाळले असून, वजनमापे तपासणी मोहीमही थंडावली आहे. त्यातच येथील कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यालयांनी कामकाज सेवकच हाकतो. परिणामी मापात पाप करणार्यांची संख्या बोकाळली आहे.
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी परभणी येथे वैधमापन शास्त्र कार्यालय कार्यरत आहे. वजन मापे वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेता या विभागाअंतर्गत परभणी, वसमत, पूर्णा या तालुक्यासाठी एक आणि गंगाखेड, सोनपेठ, पालमसाठी एक असे दोन कार्यालय परभणी येथे कार्यरत आहेत. तसेच मानवत, जिंतूर, पाथरीसाठी सेलू येथे आणि औढा, सेनगाव, कळमनुरी, हिंगोली या तालुक्यासांठी हिंगोली येथे कार्यालय आहे.
व्यापार्याकडील वजनांची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांना प्रमाणित करणे व त्यावर मोहोर उमटवणे, परवाना देणे, परवाण्याचे नुतणीकरण करणे या कार्यालयामार्फत चालतात. परंतु कार्यालयातील कारभार पाहता अनेक दिवसांपासून वजनमापे वापरकर्त्याच्या वजनांची तपासणीच होत नसल्याने ग्राहकांची सर्रास लूट होत आहे. जिल्ह्यात लाखांच्या घरात वजन मापे वापरकर्त्यांची संख्या असताना या विभागाकडे वापरकर्त्यांची संख्याच उपलब्ध नाही. आगोदरच सहाय्यक नियंत्रक नांदेड येथून कारभार पाहत असल्याने कोणाचे नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे व्यापारी परवाना न घेताच वजने वापर करताना दिसून येत आहेत. काही व्यापारी तर वजन मापाऐवजी दगड, विटांचे मापे बनवून ग्राहकांना खुलेआम फसवण्याचे प्रकार घडत असताना वजनमापे निरीक्षकही भूमिगत झालेले दिसतात. तसेच वजन व मापे वापरणे, वजनांची उत्पादकता, विक्री करणे व दुरूस्तीसाठी या कार्यालयाच्या परवाण्याची आवश्यकता असते., परंतु जिल्ह्यात याची किती आकडेवारी आहे, याची माहिती या विभागाकडे नाही. विशेष म्हणजे, दर तीन महिन्याला तपासणीचा अहवाल आकडेवारीसह वरिष्ठांना सादर करावा लागतो. अवैध वजन मापे वापरकर्त्यावर केलेल्या कारवाईचीही माहिती द्यावी लागते. परंतु कार्यालयात संपर्क साधला असता, काय कारवाई केली, किती तपासण्या केल्या याची माहिती कर्मचारी सांगू शकत नाहीत. अधिकार्यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे 'मापात पाप' करणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विभागाचा कारभार अलबेल असल्याचे दिसून आले.
कर्मचारी नेहमीच गायब
> जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयासह दोन्ही निरीक्षक कार्यालये एकाच छताखाली आहेत. या तिन्ही कार्यालयातील कर्मचारी नेहमीच गायब असतात. त्यामुळे येथे कार्यरत सेवकांनाच येथील कार्यभार सांभाळावा लागतो. कागदपत्रांची जुळवाजुळव, आलेल्या नागरिकांचे समाधान याबरोबरच फाईलींची नोंदही सेवकांना करावी लागत आहे.
परभणी कार्यालयात आल्यास माहिती सांगतो- कवरे
> वैधमापनशास्त्र कार्यालयाकडून जिल्ह्यात झालेल्या तपासणी व कारवाईची माहिती घेण्यासाठी या कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधला. परंतु एकही कर्मचारी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सेवकामार्फत सहाय्यक नियंत्रक एस.एन. कवरे यांच्याशी संपर्क साधला असता, मी परभणी कार्यालयात आल्यानंतर माहिती सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले. परंतु कवरे केव्हा तरी कार्यालयात येत असतात, असे ग्राहकांमधून बोलले जात होते.