पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:34+5:302021-07-25T04:16:34+5:30
मागील दोन वर्षांत परभणी जिल्ह्यात शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक कारणावरून विवाहितेचा छळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारी ते ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या!
मागील दोन वर्षांत परभणी जिल्ह्यात शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक कारणावरून विवाहितेचा छळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ७०७ अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे प्राप्त झाले. यानंतर चालू वर्षात २०२१ जानेवारी ते जून या कालावधीत ३६४ प्रकरणांत अर्ज दाखल झाले. यातील बहुतांश छळाच्या घटनांमध्ये पैसा, घर, शेती, गाडी या बाबींसाठी विवाहितांना त्रास देण्यात आला आहे. लग्नामध्ये कबूल केलेल्या बाबी विवाहितेच्या सासरच्या मंडळींना न मिळाल्याने हा छळ होत आहे.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
काही वर्षांत मुला-मुलींचे लग्न अनेक बाबींमुळे होत नसल्याने हुंडा देण्याची वेळ येत आहे.
यामध्ये शिक्षण, नोकरी या गोष्टी प्रामुख्याने लग्नाच्या वेळी पाहिल्या जातात.
वधू-वर यांना अपेक्षेप्रमाणे सर्व बाबी मिळत नसल्याने पैशांची मागणी लग्नामध्ये केली जाते.
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...
ग्रामीण तसेच शहरी भागात विवाहितेच्या छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
यामध्ये सर्वत्र पैशाचे कारण प्रामुख्याने अर्जामध्ये दाखल केलेले असते.
शारीरिक, मानसिक छळ होत असला तरी त्यासाठी सुरुवातीला पैशांची मागणी विवाहितेकडे केली जाते.
४८१ प्रकरणे निकाली
भरोसा सेलकडे प्राप्त झालेल्या जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील एकूण ४८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पी.एस. मोराळे, एस.के. कावळे, एस.पी. एकाडे, मधुकर चट्टे, आशा लांडगे, सीमा चाटे, राजेश शिंदे, वंदना चव्हाण, संघमित्र होळकर यांनी प्रयत्न केले.
हुंडा न घेता लग्न करण्याची तयारी आहे. मात्र सध्या मुलींचे प्रमाण घटल्याने व मुलींच्या नोकरी व शिक्षणाच्या अटी पाहता अनेक ठिकाणी नकार येतो. यामुळे तडजोड करावी लागते.
- विष्णू जाधव
लग्न बोलणी करण्यापूर्वीच देण्या-घेण्याच्या गोष्टीवरून आजही वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये वाद होतो. यातून लग्न जुळण्याऐवजी तुटते. यामुळे हा प्रकार बंद व्हावा.
- राजू पांडे