वर्षभरात गॅस सिलिंडर २१७ ने वाढले ; सबसिडी केवळ ९ रुपये ७५ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:06+5:302021-07-17T04:15:06+5:30
परभणी : केंद्र शासनाने ग्रामीण भागात उज्ज्वला योजना अंमलात आणून चुलीच्या जागी गॅस सिलिंडर बसविले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या ...

वर्षभरात गॅस सिलिंडर २१७ ने वाढले ; सबसिडी केवळ ९ रुपये ७५ पैसे
परभणी : केंद्र शासनाने ग्रामीण भागात उज्ज्वला योजना अंमलात आणून चुलीच्या जागी गॅस सिलिंडर बसविले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या योजनेंतर्गत तीन महिने मोफत सिलिंडर देण्यात आले. मात्र त्यानंतर जुलै २०२० ते जुलै २०२१ या वर्षभरात २१७ रुपयांनी गॅस सिलिंडर महागले असून सद्यस्थितीत ८६० रुपयांना दिले जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी मिळणारी ४०० रुपयांची सबसिडी आता ९ रुपये ७५ पैसे मिळत आहे.
वाढत्या महागाईचा महिलांना मोठा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. वर्षभरापूर्वी ६०८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ८६० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या बजेटवर परिणाम झाला आहे.
- अर्चना देशमुख
उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी मदत देण्यात आली. त्यातून गॅस कनेक्शन वाढले. मात्र आता या लाभार्थ्यांना गॅस भरण्यासाठी ही पैसे उपलब्ध नाहीत. त्यातच शहरात आता चुली पेटविण्यासाठी मनाई आहे.
-पूजा जोशी