तहसील कार्यालयात मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:51 IST2017-07-19T15:51:14+5:302017-07-19T15:51:14+5:30
स्माशानभूमीसाठी जागा नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थानी बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास एका मयत व्यक्तीच्या मृतदेहावर सेलू तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार केले.

तहसील कार्यालयात मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 19- निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या देवला पुनर्वसन गावात स्माशानभूमीसाठी जागा नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थानी बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास एका मयत व्यक्तीच्या मृतदेहावर सेलू तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार केल्याने खळबळ उडाली आहे.
सेलू तालुक्यातील देवला हे गाव निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले आहे. या गावचे पुनर्वसन झालेले असताना गावाला स्मशानभूमी नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ स्मशानभूमीची मागणी करीत आहेत. परंतु या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची भावना आहे. 18 जुलै रोजी गावातील अश्रोबा पंडुरे (60) यांचे आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा ग्रामस्थांसमोर प्रश्न निर्माण झाला. दरवेळी गावापासून 4 किमी अंतरावर असलेल्या सेलू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याऐवजी ग्रामस्थानी तहसील कार्यालयात मृतदेह आणला. येथे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्याशी ग्रामस्थानी चर्चा केली पण ठोस तोडगा निघत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थानी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.