दीड लाख लाभार्थ्यांना मोफत धान्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:37+5:302021-05-16T04:16:37+5:30
गंगाखेड: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोर ...

दीड लाख लाभार्थ्यांना मोफत धान्याचा आधार
गंगाखेड: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोर गरीब कुटुंबातील १ लाख ३९ हजार शिधापत्रिकाधारकांना केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मोफत स्वस्त धान्याचा आधार मिळाला आहे.
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊन गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांकरिता राज्य शासनाकडून प्रति सदस्य तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ व केंद्र शासनाच्या वतीने प्रति सदस्य सहा किलो गहू, चार किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था पाहणाऱ्या शहरातील १९ व ग्रामीण भागातील १४४ अशा तालुक्यातील एकूण १६३ स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत धान्य वाटप केल्या जात आहे. मे महिन्याचे मोफत धान्य वाटपास सुरुवात झाली असून, अंतोदय अन्न योजनेतील १८ हजार ७८३ व प्राधान्य कुटुंब योजनेतील १ लाख २० हजार १६४ अशा एकूण १ लाख ३८ हजार ९४७ लाभार्थ्यांना आधार मिळणार आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनी अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मे व जून महिन्यात मोफत धान्यवाटप करावे, अशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत.
तहसीलदार गणेश चव्हाण, तहसीलदार, पुरवठा विभाग