चार तालुके कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST2021-09-12T04:22:08+5:302021-09-12T04:22:08+5:30
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण ...

चार तालुके कोरोनामुक्त
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संपूर्ण जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झाला नाही. चार तालुक्यांच्या ग्रामीण भागात सद्य:स्थितीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सेलू, मानवत, पूर्णा आणि गंगाखेड हे चारही तालुके सद्य:स्थितीला कोरोनामुक्त तालुके म्हणून जाहीर झाले आहेत.
मात्र, दुसरीकडे इतर पाच तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या अजूनही कायम आहे. त्यात परभणी एक, जिंतूर तालुक्यात दोन, सोनपेठ दोन, पालम तालुक्यात एक आणि पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या तालुक्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी बाराही रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच नवीन रुग्ण नोंद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
नियमित मास्कचा वापर, आरटीपीसीआर तपासण्या केल्यास उर्वरित पाच तालुकेदेखील कोरोनामुक्त करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून आरोग्य विभागाने अधिकची प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या गावांमध्ये सक्रिय रुग्ण
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ सक्रिय रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात पाथरी तालुक्यातील मंजरथ, बाभूळगाव, डाकूपिंपरी, उमरा येथे प्रत्येकी एक आणि देवनांद्रा येथे दोन सक्रिय रुग्ण आहेत. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी व भोगाव, परभणी तालुक्यांतील पिंगळी, सोनपेठ तालुक्यातील तुळशीराम तांडा व कोरटेक आणि पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे.
दहा दिवसांत नोंद झालेले रुग्ण
१ ते १० सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण भागांमधून बारा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १ सप्टेंबर रोजी ३, २ सप्टेंबर रोजी ४, ३ सप्टेंबर रोजी २, ४ सप्टेंबर रोजी १ आणि ५ सप्टेंबर रोजी २ रुग्णांची नोंद झाली. ६ सप्टेंबरपासून मात्र अद्यापपर्यंत एकही रुग्ण नोंद झाला नाही.
नियम पाळण्याचे आवाहन
जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरी, भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी जात असताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन केल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.