जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:37+5:302021-04-15T04:16:37+5:30
परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत ...

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य
परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत धान्य वितरण निर्णयाचा लाभ होणार आहे.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम दारिद्र्य रेषेखालील तसेच गरजू कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दृष्टीकोनातून राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थ्यांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६८९ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये बीपीएल कुटुंबातील ७० हजार ९२३ तर अंत्योदय योजनेतील ४४ हजार ९५३ आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या २ लाख ९४ हजार ७६ रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबीयांना ५ किलो मोफत धान्य देण्याची मंगळवारी घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
हाताला काम नसल्याने घरीच बसून आहोत. आता शासनाने ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे काम मिळणेही कमी झाले आहे. त्यामुळे वर्षभर शासनाने हा निर्णय लागू करावा. याचा गरजू लोकांना फायदा होईल.
१५ दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आले आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. त्यातूनच कोरोनावर मात करता येईल.
सरकारचा निर्णय चांगला आहे. गेल्या वर्षीही जवळपास सहा महिने सरकारने मोफत धान्य दिले होते. आताही १५ दिवसांसाठी का होईना हे धान्य मिळणार आहे. परंतु, धान्याचा दर्जा चांगला राहावा.
तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे.
अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे नवे रेशन कार्ड प्राप्त झाले आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.