खून प्रकरणातील चारही आरोपी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:10 IST2017-08-01T00:10:03+5:302017-08-01T00:10:03+5:30
मानवत येथील खून प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीस सोलापूर येथे तर इतर तिघांना पुणे येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खून प्रकरणातील चारही आरोपी पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानवत येथील खून प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीस सोलापूर येथे तर इतर तिघांना पुणे येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागनाथ लेंगुळे या युवकाच्या खून प्रकरणी अमरदीप रोडे, व्यंकट शिंदे, दीपक बारहाते, शेख हाजू या चार प्रमुख आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. उशिराने यश आल्याचे झळके यांनी सांगितले. या प्रकरणातील एक आरोपी सिकंदराबाद येथून हुसेन सागर एक्सप्रेसने सोलापूर येथे जाणार असल्याची माहिती परभणी पोलिसांना मिळाली. त्यावरुन सोलापूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना आरोपीची संपूर्ण माहिती, छायाचित्र पाठविले. सोलापूर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे तपासली. त्यात अमरदीप रोडे हा मिळून आला. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी भ्रमणध्वनीवरुन अमरदीप रोडे याच्याशी संपर्क साधून इतर आरोपींची माहिती घेतली. तेव्हा बंटी नावाचा एक व्यक्ती पुणे स्थानकावर येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे परभणी पोलिसांनी बंटी याची सर्व माहिती, फोटो, संकलित करुन पुणे क्राईम ब्रँचच्या अधिकाºयांना दिली. ३० जुलैच्या रात्रीच दीड वाजता बंटीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती काढत अतुलनगर सोसायटी (ता.हवेली) येथून व्यंकट शिंदे, दीपक बारहाते आणि शेख आजू या तीन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात आता आठ आरोपी अटक झाले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, नानलपेठ पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या कर्मचाºयांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या पत्रकार परिषदेस विश्व पानसरे, संजय हिबारे यांची उपस्थिती होती.