विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप
By राजन मगरुळकर | Updated: April 24, 2025 18:33 IST2025-04-24T18:32:35+5:302025-04-24T18:33:10+5:30
दोन्ही कुटुंबांतील एकूण सात जण पहलगामला जाणार होते. परंतु, विमान उशिराने धावल्याने जाणे टळले

विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप
परभणी : शहरातील रहिवासी असलेले दोन कुटुंबीय रविवारी रात्री श्रीनगरला पोहोचले होते. पहलगाम येथे सोमवारी हे कुटुंब पोहोचणार होते. परंतु विमान उशिराने धावले. त्यातच जम्मू-काश्मीर भागात पाऊस पडला, परिणामी रस्ते बंद झाले. त्यामुळे ते बुधवारी पहलगाम जाण्याचा विचार करत होते; परंतु मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांचे तेथे जाणे रद्द झाले. सध्या हे दोन्ही कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत.
परभणी शहरातील लोकमान्यनगर भागातील गोपाळ मधुकर गाडगे हे भारतीय आयुर्विमा महामंडळमध्ये हिंगोलीत सहायक प्रशासकीय अधिकारी आहेत तर संदीप चंद्रवंशी (रा. यशवंतनगर) हे परभणीत एलआयसीमध्ये वरिष्ठ सहायक कार्यरत आहेत. गाडगे आणि चंद्रवंशी या दोन्ही कुटुंबांतील एकूण सात जण परभणीहून सिकंदराबाद येथे १९ एप्रिलला निघाले. रविवारी ते हैदराबादवरून श्रीनगरला रात्री पोहोचले. सोमवारी ते पहलगामला जाणार होते. परंतु, विमान उशिराने धावले व काश्मीर भागात काही ठिकाणी पाऊस पडल्याने रस्ते बंद झाले होते. त्यामुळे नियोजित दौऱ्यात बदल करून ते बुधवारी पहलगामला जाणार होते. पहलगामला मंगळवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर या कुटुंबांनाही धक्का बसला.
घटनेनंतर या कुटुंबांनीही हळहळ व्यक्त केली. शिवाय त्यांच्या परभणीतील कुटुंबातील सदस्यांनी काळजी व्यक्त केली. कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्याशी दररोज संपर्क सुरू असून, ते सोनमर्ग आणि इतर ठिकाणी जाऊन नंतर श्रीनगर येथे वास्तव्यास थांबले आहेत. गुरुवारी श्रीनगर भागातील रस्ते सुरू झाल्यावर पुढे ते वैष्णोदेवी, अमृतसरमार्गे परभणीकडे येणार आहेत. यामध्ये गाडगे आणि चंद्रवंशी यांच्या पत्नी आणि मुलांचा सहभाग आहे.