सापडलेले पाच हजार रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:15+5:302021-06-06T04:14:15+5:30
परभणी तालुक्यातील परळगव्हाण येथील राजू कांबळे हे ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास परभणीहून दुचाकीने परळगव्हाणकडे जात होते. ...

सापडलेले पाच हजार रुपये केले परत
परभणी तालुक्यातील परळगव्हाण येथील राजू कांबळे हे ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास परभणीहून दुचाकीने परळगव्हाणकडे जात होते. विद्यापीठ भागातील रस्त्याने गावाकडे जात असताना खिशातील पाकीट खाली पडले. घरी गेल्यानंतर पाकीट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हरवलेल्या पाकीटचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला; परंतु त्यांना पाकीट न सापडल्याने राजू कांबळे हताश झाले होते.
याच दरम्यान, विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या प्रदीप व्यंजने या युवकाला हे पाकीट सापडले. पाकीटमध्ये पाच हजार रुपये असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. पाकीटमधील इतर कागदपत्रांवर असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या साह्याने प्रदीप व्यंजने याने राजू कांबळे यांना फोनद्वारे ही माहिती दिली. हे पाकीट राजू कांबळे यांचेच असल्याची खात्री झाल्यानंतर प्रदीप व्यंजने याने राजू कांबळे यांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास परभणी येथे बोलावून त्यांचे पाकीट व त्यातील ५ हजार रुपये परत केले. युवकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल मंगेश वाकोडे, बालाजी कांबळे आदींनी व्यंजने यांचा सत्कार केला.
लॉकडाऊन काळात जपली माणुसकी
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे मिळालेल्या पैशांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु हे पैसे आपले नाहीत, ते इतर कोणाचे आहेत, ज्याचे पैसे हरविले ते देखील अडचणीत असतील, ही जाणीव व्यंजने याला होती. त्यातूनच प्रदीप व्यंजने याने ज्यांचे पैसे सापडले, त्यांना ते प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.