परभणी जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात या भाजीपाल्याला आधारभूत किंमत मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला घेतात. शेतकरीही माल वाया जाईल या भीतीने त्याची विक्री करून मोकळे होतात. याच मालाचे दर दुप्पट-तिप्पट होतात. मूळ खरेदीदार ते ग्राहक या साखळीमध्ये हे दर वाढल्याचे दिसून येतात. यामुळे ग्राहक नेहमीच भाजीपाला महाग असल्याची ओरड करतात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच उरत नाही आणि ग्राहकाला भुर्दंड सहन करावा लागतो.
कोणत्या भाजीला काय भाव ?
भाजी भाव
वांगी ४० रुपये किलो
टोमॅटो ३० रुपये किलो
भेंडी ४० रुपये किलो
चवळी ४० रुपये किलो
पालक ४० रुपये किलो
कोथिंबीर ८० रुपये किलो
मेथी १५ रुपये जूडी
हिरवी मिरची १० रुपये छटाक
पत्तागोबी ४० रुपये किलो
फलगोबी ४० रुपये किलो
दोडके ४० रुपये किलो
भावात एवढा फरक का
फळ, भाजीपाला याची विक्री करताना शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणे गरजेचे आहे. मात्र, शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे नाशवंत माल लगेच मिळेल त्या भावाने विक्री करण्याची घाई शेतकऱ्यांनी झालेली असते. यामुळे पैशाचे नुकसान होते. परिणामी, शेतकरी अडचणीत सापडतो. - विलास बाबर, शेतकरी नेते.