जिल्ह्यातील पाच तलाव कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST2021-07-05T04:13:13+5:302021-07-05T04:13:13+5:30
या वर्षीच्या जून महिन्यात होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी ...

जिल्ह्यातील पाच तलाव कोरडेठाक
या वर्षीच्या जून महिन्यात होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा झाला. त्यामुळे शहरी भाग आणि ग्रामीण भागातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला. मात्र, असे असताना तालुक्यातील लघु तलावांमध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही लघु तलावात पाणीसाठा जमा झालेला नाही. परभणी तालुक्यातील पेडगाव मानवत तालुक्यातील आंबेगाव, गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी, जिंतूर तालुक्यातील देगाव, बेलखेडा या पाच तलावांमधील पाणीसाठा झाला नसल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जून महिन्यात भरपूर पाऊस झाला असला तरी तो सर्वदूर नव्हता. परिणामी लघु प्रकल्पांमध्ये अजूनही पाणीसाठा झालेला नाही. या प्रकल्पातील पाणी साठ्यावर परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त असते. परंतु पाच तलावांमध्ये पाणी साठा नसल्याने या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
केवळ २५ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात एकूण २२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सध्या १७.३१० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यात १० दलघमी पाणीसाठा उपयुक्त आहे. लघु प्रकल्पांमधील उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी २५ टक्के एवढी आहे. त्यामुळे आणखी ७५ टक्के पाण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.