पर्यावरण दिनी वनविभागाच्या रोप वाटिकेला आग
By Admin | Updated: June 5, 2017 18:46 IST2017-06-05T18:46:42+5:302017-06-05T18:46:42+5:30
येलदरी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाने तयार केलेल्या रोप वाटिकेला ५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली.

पर्यावरण दिनी वनविभागाच्या रोप वाटिकेला आग
>ऑनलाइन लोकमत
येलदरी (जि. परभणी ), दि. 5 - येलदरी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाने तयार केलेल्या रोप वाटिकेला ५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत शेकडो झाडे जळाली असून जागतिक पर्यावरण दिनीच लागलेल्या या आगीमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
येलदरी धरणाच्या पायथ्याशी वनविभागाने रोपवाटिका तयार केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोप वाटिकेला आग लागली. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आग वाढत गेली. पाहता पाहता संपूर्ण रोप वाटिकेत आग पसरली. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर गावकºयांनी रोप वाटिकेकडे धाव घेतली. मात्र आगीचे स्वरुप मोठे असल्याने ही आग विझवता आली नाही. रोप वाटिेकेच्या ठिकाणी पाणी उपलब्ध होते. परंतु, वन विभागाचा कर्मचारी अथवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे पाणी असतानाही आग विझविण्यासाठी या पाण्याचा वापर करता आला नाही. परिणामी शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली. दरम्यान, गावकºयांनीच जिंतूर अग्नीशमन अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमनची गाडी दाखल झाली. एक तासांनी ही आग आटोक्यात आली.
विशेष म्हणजे ५ जून रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जात आहे. मात्र याच दिवशी कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेली रोपवाटिका जळून खाक झाली. येलदरी येथील उपसरपंच प्रमोद चव्हाण यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना फोन लावून आगीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाºयांनी फोनही उचलला नाही. रोपवाटिकेच्या शेजारीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, महावितरण व पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.
दोन वर्षांपूर्वी लावली होती झाडे-
पाटबंधारे विभागाच्या ३ हेक्टर जमिनीवर वनविभागाने २०१५ मध्ये वृक्ष लागवड केली होती. या ठिकाणी ४ हजारहून अधिक झाडे लावण्यात आली. या झाडांसाठी ड्रीपची व्यवस्थाही करण्यात आली होती. झाडांची वाढ चांगली झाल्याने हा परिसर रमणीय झाला होता. मात्र वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांचे या रोपवाटिकेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले. उन्हाळ्यात हे गवत वाळून गेल्याने आग पसरण्यास मदत झाली व रोपवाटिकेचे नुकसान झाले.