अखेर एचआयव्ही बाधित मुलांची यातनातून सुटका

By Admin | Updated: June 5, 2014 00:10 IST2014-06-04T23:49:18+5:302014-06-05T00:10:36+5:30

परभणी : एचआयव्ही बाधित ११ जणांची बालगृहचालकाच्या यातनातून अखेर सुटका झाली. या ११ बाधित मुला-मुलींना पोलिस संरक्षणात लातूरच्या सेवालयगृहात स्थलांतरीत केले आहे.

Finally, the survivors of HIV infected children rescued | अखेर एचआयव्ही बाधित मुलांची यातनातून सुटका

अखेर एचआयव्ही बाधित मुलांची यातनातून सुटका

परभणी : एचआयव्ही बाधित ११ जणांची बालगृहचालकाच्या यातनातून अखेर सुटका झाली. या ११ बाधित मुला-मुलींना पोलिस संरक्षणात लातूरच्या सेवालयगृहात स्थलांतरीत केले आहे. तत्पूर्वी मुलांनी दिलेल्या जबाबावरुन येथील जीवनरेखा बालगृहाचे अध्यक्ष जावेद फारोखी यांना नानलपेठ पोलिसांनी मुलांच्या अपहरणासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. येथील कडबीमंडीत नारी विकास महिला मंडळ संचलित जीवनरेखा बालगृह (विशेष) मध्ये एकूण १३ एचआयव्ही बाधित मुले आणि मुली राहत होते. महिला व बालविकास विभागांतर्गत शासकीय अनुदानित ही संस्था होती. परंतु, गैरव्यवहारामुळे या मुलांची पिळवणूक होत होती. त्यांना सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. या मुलांसाठी संस्थेला दानशूर व्यक्तींनी केलेली मदतही या मुलांना दिली जात नसे. या मुलांना अंत्योदय योजने अंतर्गत मिळणारे धान्यही परस्पर विकले जात असे. या सर्व प्रकाराविरुद्ध होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरिटीज (एचएआरसी)चे डॉ.पवन चांडक यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. माहितीच्या अधिकारात गैर व्यवहार उजेडात आणला होता. त्यांनी या मुलांच्या पिळवणुकीविरुद्ध आवाज उठविला आणि या मुलांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी तक्रार बालकल्याण समितीकडे केली होती. परभणी येथील बालकल्याण समितीचे डॉ. इंद्र ओसवाल, वानखेडे, वाघमारे यांनी या तक्रारीची दखल घेऊन १ जून रोजी या मुलांना लातूर येथील सेवालय संस्थेत स्थलांतरित करण्याचा आदेश काढला. त्यानंतर अध्यक्ष फारोखी यांनी विनापरवानगी मुलांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. मुलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी छापा मारुन फारोखीसह मुलांना ताब्यात घेतले आणि बालकल्याण समितीच्या सपूर्द केले. समितीने या मुलांना ४ जून रोजी लातूरला सेवालयात पाठविले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Finally, the survivors of HIV infected children rescued