हरभरा उत्पादकांच्या खात्यावर पावणेदोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:29+5:302021-04-17T04:16:29+5:30

या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद व मूग आदी पिकांची ...

Fifty two crore on the account of gram growers | हरभरा उत्पादकांच्या खात्यावर पावणेदोन कोटी

हरभरा उत्पादकांच्या खात्यावर पावणेदोन कोटी

या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद व मूग आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी उपलब्ध झालेल्या या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयोग करून घेतला. शेतकऱ्यांनी या वर्षी सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे उत्पादन झाले. मात्र हा शेतमाल बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावाला फाटा देत कवडीमोल दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकरी, लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली. त्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांना हरभरा विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ९ हजार ३४८ शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांनी २५ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या काळात जिल्ह्यातील ४ हजार ५६० शेतकऱ्यांना आपला शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे विक्रीस आणावा यासाठी मोबाइलवर एसएमएस पाठविले. त्यानंतर आतापर्यंत ५०५ शेतकऱ्यांकडून ५ हजार १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव खरेदी केंद्रांनी खरेदी केलेल्या ३ हजार ४७५ क्विंटलची १ कोटी ७७ लाख २५ हजार ५० रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे या वर्षी हमीभाव खरेदी केंद्रांकडून ५ हजार १०० रुपये हमीभाव दराने हरभरा खरेदी केल्यानंतर त्याचा मोबदलाही वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अशी झाली खरेदी

परभणी जिल्ह्यात द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर आतापर्यंत ५ हजार १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १ हजार ५९४ क्विंटल, जिंतूर येथे ३९७ क्विंटल, सेलू २३७, बोरी ४१९, पाथरी १ हजार ६२२ क्विंटल, पूर्णा ९२४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनपेठ येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र प्रशासनाला हमीभाव दराने हरभरा खरेदी करण्यास मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

सात हमी केंद्रांवर झालेली नोंदणी

परभणी - ४२१९

जिंतूर - ७२२

सेलू - ७४२

बोरी - १५८५

पाथरी - ७५७

पूर्णा - ११२२

सोनपेठ - २०१

शेतकऱ्यांना पाठविलेले संदेश

परभणी - २२५०

जिंतूर - २४०

सेलू - ३३०

बोरी - १५८५

पाथरी - ७५७

पूर्णा - ११२२

सोनपेठ -

Web Title: Fifty two crore on the account of gram growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.