रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST2020-12-12T04:33:58+5:302020-12-12T04:33:58+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने ...

रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत हरभरा, गहू पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. नदी, नाले व शेतकऱ्यांकडील जलस्त्रोतांना उपलब्ध असलेल्या पाण्यातून सिंचन करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून एका आठवड्यात दिवसा व दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येतो. त्यातही अनेक वेळा तांत्रिक बिघाडच्या नावाखाली वारंवार वीज खंडीत केली जाते. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना वाढता गारवा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेवून रात्री-अपरात्री रबी हंगामातील हरभरा व गहू या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक वेळा जिल्हा प्रशासन व महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे वीज वितरण कंपनीच्या वतीने दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंप धारकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.