शेतकर्यांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 23, 2014 14:25 IST2014-10-23T14:25:13+5:302014-10-23T14:25:13+5:30
अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

शेतकर्यांची दिवाळी अंधारात
देवगावफाटा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले असून, शेतकर्यांची दिवाळी अंधारात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
देवगावसह चिकलठाणा मंडळामध्ये शेतकर्यांनी कापूस व सोयाबीन पीक घेण्यास पसंती दर्शविली होती. परंतु, सहा नक्षत्र कोरडेठाक गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. मघा आणि पूर्वा नक्षत्रात पावसाच्या हजेरीने खरीप पिकास जीवदान मिळाले होते. खरिपाची सुगी करून बळीराजा दिवाळी दणदणीत साजरा करायचा.
परंतु, यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले. परिणामी दिवाळी झगमगाटात साजरी होत असली तरी शेतकर्यांच्या हृदयात मात्र अंधकाराची हुडहुडी भरली आहे. सोयाबीनच्या एका बॅगचा बियाणाचा खर्च २ हजार ७00 रुपये, खतासाठी १ हजार रुपये, फवारणी व मजुरीसाठी ८00 रुपये तर काढणीसाठी १५00 रुपये असा ६ हजार रुपये खर्च आला असून, एका बॅगला उत्पन्न मात्र १00 किलो निघत आहे.
सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 ते ३000 रुपये भाव मिळत असल्याने खर्च निघणे अवघडझाले आहे. एक प्रकारे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसते. काही शेतकर्यांनी कापूस व सोयाबीनचे पीक वाया जावू नये म्हणून सिंचनाची सोय केली. परंतु, भारनियमनामुळे त्यालाही फटका बसला.
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे ज्वारी, हरभरा यांची पेर धोक्यात आली आहे. एकंदरीत शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
■ खरिपाची पेर वाया गेली. तर रबीची पेरच धोक्यात आली. सोयाबीनची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्यांनी सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली. अशी विदारक परिस्थिती असतानाही अधिकारी मात्र सरकारला या संदर्भात अंधारात ठेवीत आहेत. महसूल विभागाने वस्तुनिष्ठ आणेवारी काढावी व शेतकर्यांना मदत करावी, अशी मागणी सूर्यकांत होणराव व नागनाथ साळेगावकर यांनी केली आहे. आर्थिक मदत जाहीर करावी
> खरिपाची पेरणी वाया गेल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखलघेऊन सोयाबीनच्याभावात वाढ करावी, व नुकसानीबद्दल आर्थिक मदत जाहीर करून बळीराजास दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी रमेश तांबे यांनी केली.