कुटुंब नियोजनाची भिस्त महिलांच्याच खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:27+5:302021-02-07T04:16:27+5:30
कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी एक किंवा दोन संततीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी ...

कुटुंब नियोजनाची भिस्त महिलांच्याच खांद्यावर
कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी एक किंवा दोन संततीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही एकाने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांनाच पुढे केले जात असल्याचे मागील अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागच्या दोन वर्षांपासून पुरुष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. चालू वर्षात केवळ ६ पुरुषांनी नसबंदी करून घेतली असून, मागील वर्षात तर पुरुष नसबंदी करणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ ३ एवढीच होती. त्यामुळे कुटुंब नियोजनाची सर्व भिस्त महिलांच्या खांद्यावर असल्याचेच स्पष्ट होत आहे.
काय आहेत गैरसमज?
पुरुष नसबंदीसाठी पुरुषांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यात मुख्य गैरसमज म्हणजे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर नपुंसकत्व येते. त्याचप्रमाणे, महिलांच्या तुलनेत पुरुषांना शारीरिकदृष्ट्या कष्टाची कामे करावी लागतात. नसबंदी केल्यानंतर कमजोरी येऊ शकते, असा एक गैरसमज असून, त्यातून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुरुष मंडळी पुढे येत नाहीत. या शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असल्याने कुटुंब नियोजनासाठी महिलांनाच पुढे केले जात असल्याचेही एकंदर परिस्थितीवरून दिसून येत आहे.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंदर्भात समाजात गैरसमज आहेत. या शस्त्रक्रियांसाठी आरोग्य विभागातून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र, प्रतिसाद मिळत नाही. पुरुष नसबंदी ही महिलांच्या नसबंदीपेक्षा अतिशय सोपी आहे. त्यात कोणताही त्रास होत नाही. महिलांना शस्त्रक्रियेनंतर ७ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते, तर दुसरीकडे पुरुष नसबंदी झाल्यानंतर केवळ एका तासात सुट्टी मिळते. नसबंदीनंतर दैनंदिन जीवनात इतर कोणताही शारीरिक त्रास होत नाही.
- डॉ.संजय हरबडे, वैद्यकीय अधिकारी, सेलू