सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; पोलीस ठाण्यांमध्ये वाढल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST2021-07-04T04:13:27+5:302021-07-04T04:13:27+5:30
फेसबुक, व्हॉट्स्ॲप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फेसबुकवरील एखादे अकाऊंट हॅक करुन या ...

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; पोलीस ठाण्यांमध्ये वाढल्या तक्रारी
फेसबुक, व्हॉट्स्ॲप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फेसबुकवरील एखादे अकाऊंट हॅक करुन या अकाऊंटमधील फ्रेंडलिस्टचा वापर करीत पैशांची मागणी करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. फेसबुक अकाऊंटवरून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांनी स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी. तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून फेसबूक अकाऊंट बंद करण्याची कारवाई केली जाते. मात्र अशा स्वरूपात तक्रारी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले नाहीत. तेव्हा फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास नागरिकांनी तक्रारींसाठी पुढे येण्याची गरज आहे.
माहिती संकलनाचे काम सुरू
जिल्हा पोलिसांकडे डिजिटल माध्यमातून दाखल झालेल्या तक्रारींची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. दोन दिवसांपूर्वी सायबर सेलकडून ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मात्र अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यातून या सेलकडे माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोना काळामध्ये वाढल्या तक्रारी
दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लॉकडाऊनमुळे गर्दीची ठिकाणे ओस पडली. परिणामी डिजीटल साधनांचा वापर करुन फसवणूक वाढली आहे.
व्हिडिओ कॉल करुन संबंधितास अश्लील छायाचित्रे दाखवत संबंधिताची फसवणूक केल्याचे प्रकार मागच्या चार महिन्यात वाढले आहेत.
फेसबुककडे जातो अर्ज
फेसबुक अकाऊंटवर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल करावी लागते.
पोलीस प्रशासनातील सायबर सेलकडे ही तक्रार आल्यास सेलच्या माध्यमातून फेसबुकला रितसर ई-मेल व अर्ज पाठवून फेसबुक अकाऊंट बंद केले जाते.
तक्रार केल्यानंतर साधारणत: ७ ते ८दिवसात ही कारवाई होते.
तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...
फेसबुकवरून बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये तक्रारींची संख्या मात्र अत्यल्प आहे.
फेसबुक अकाऊंट वापरणाऱ्यांनी त्याच्या पोस्ट केवळ मित्रांनाच दिसतील अशा पद्धतीची सेटींग करावी. सेटींगमधील ऑल या ऑप्शन ऐवजी ओन्ली फ्रेड हे ऑप्शन सलेक्ट करावे.
फेसबुकचा वपर करीत असताना एखाद्या मित्राकडून पैशांची मागणी होत असेल तर मोबाईलवरुन खात्री करुन त्यानंतरच मदत करावी.
फेसबुक अकाऊंट बनावट आहे, असा संशय आल्यानंतर या संदर्भात थेट स्थानिक पोलीस किंवा सायबर शाखेकडे रितसर तक्रार दाखल करावी.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मागील दोन वर्षांपासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फोन करून एटीमकार्ड आणि बँकांची माहिती मागवून खात्यातील रक्कम परस्पर लांबविली जाते.
तसेच मोबाइलवर एनी डेस्क ॲप डाऊनलोड करून मोबाइलवर सर्व डाटा हस्तगत करीत फसवणूक करण्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत.
या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाकडे मोजक्याच तक्ररी दाखल होतात. डिजिटल माध्यमातून फसवणूक करण्याचे वाढत असलेले प्रकार लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
या अंतर्गत सायबर सेल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे गुन्हे थांबविण्यासाठी तसेच आरोपींना शोधण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली आहे.